लॅपटॉप रडतखडत चालतोय? एका झटक्यात वाढेल 'स्पीड'... 'या' गोष्टी नक्की करा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:47 PM 2023-08-04T19:47:10+5:30 2023-08-04T20:08:05+5:30
तुमचाही लॅपटॉप काम करताना मध्येच स्लो होतो का? वाचा या टीप्स... How to increase Laptop speed: आजच्या युगात लॅपटॉप हे एक महत्त्वाचे उपकरण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे विशेष महत्त्व आहे. काम, अभ्यास, मनोरंजन आणि इतर अनेक गोष्टींसाठी आपण लॅपटॉपचा वापर करतो. पण लॅपटॉपचा वेग बरेचदा कमी होतो असा अनुभव अनेकांना येतो.
कधीकधी आपल्या लॅपटॉपचा वेग कमी होऊ शकतो, ज्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी काही उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या सोप्या टिप्स तुम्हाला घरबसल्या तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढवण्यास मदत करतील.
लॅपटॉप वेळच्या वेळी अपडेट करा- तुमच्या लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर्स आणि सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करणे खूप महत्वाचे आहे. नवीन अपडेट्स तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढवण्यात मदत करतात आणि सिस्टमची सुरक्षा देखील राखतात.
नको असलेल्या फाइल्स वेळीच काढून टाका- तुमच्या लॅपटॉपवर जितक्या जास्त फाइल्स आणि डेटा असेल तितका त्याचा वेगावर परिणाम होतो. त्यामुळे तुमचा लॅपटॉप नियमित अंतराने क्लीन करा आणि नको असलेल्या फाइल्स डिलीट करत जा.
व्हायरस स्कॅनिंगचा नियम पाळा- तुमचा लॅपटॉप नियमित अंतराने स्कॅन करा. व्हायरस आणि मालवेअरचा लॅपटॉपमध्ये आल्यास त्याचा स्पीडवर परिणाम होतो. एक चांगला अँटीव्हायरस तुमचा लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.
लॅपटॉप स्वच्छ ठेवा- तुम्ही वापरत असलेला लॅपटॉप कायम स्वच्छ ठेवत जा. लॅपटॉपची स्क्रीन, कीबोर्ड आणि वेंटिलेशन ग्रिल नियमित स्वच्छ करत राहा. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपचा स्पीड नक्कीच सुधारेल.
अनावश्यक प्रोग्राम बंद करा- तुम्ही तुमचा लॅपटॉप वापरत असताना एकाच वेळी किती प्रोग्राम्स चालू आहेत याकडे लक्ष द्या. अनावश्यक प्रोग्राम बंद करत जा, जेणेकरून वेगावर कोणताही परिणाम होणार नाही.