‘स्क्रीन टाइम’ कसा होईल कमी? 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, मग प्रश्नच मिटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:30 AM 2023-04-12T11:30:24+5:30 2023-04-12T11:35:47+5:30
कोरोनानंतर आता मुलांना मोबाइलमध्ये वेळ घालविण्याची सवय वाढली आहे, याचे कारण या काळात वाढलेले ऑनलाइन शिक्षण. शिक्षणाच्या निमित्ताने मोबाइल, टॅब, लॅपटॉप मुलांच्या हातात आला असला, तरी त्याचा शिक्षणाव्यतिरिक्त मोबाइल गेम्स, व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक वापर होतो.
किशोरवयीन पिढीमध्ये स्क्रीन टाइम वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेकांना चष्माही लागला आहे. त्यामुळे सुट्यांच्या काळात हा वाढता स्क्रीन टाइम कमी कसा करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? याचे उत्तर होय असेल, तर तुम्ही लक्ष द्या.
गॅझेट कसे वापरायचे? लहान मुले पालकांकडे पाहून शिकत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर सतत मोबाइल पाहणे, कामाव्यतिरिक्त लॅपटॉप वापरणे टाळावे. गॅझेट वापरण्याबाबत समजावून सांगणे.
स्क्रीन टाइमचे महत्त्व मुलांच्या वयानुसार त्यांना ‘स्क्रीन टाइम’ मर्यादित ठेवण्याचे महत्त्व पटवून द्या. इलेक्ट्रॉनिक गॅझेट अधिक वापरल्यास त्याचे परिणाम कायम होतात, याबाबत मुलांना माहिती द्यावी.
घरात ‘टेक फ्री झोन’ हवा घरातील एखाद्या खोलीत मोबाइल, लॅपटॉप, टॅब वापराला बंदी असावी. घरातील स्वयंपाक, जेवणाचे टेबल, गच्ची अशा भागाला तुम्ही ‘टेक फ्री झोन’ करू शकता. जेवण करताना किंवा झोपायच्या वेळी मुलांना मोबाइल, टॅब यापासून दूर ठेवा.
उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवा ऑनलाइन वर्गानंतर मुलांना ‘स्क्रीन’पासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम, खेळ यांमध्ये व्यस्त ठेवा. मुलांच्या कल्पकतेला वाव मिळेल, असे उपक्रम त्यांना करायला सांगा.
शारीरिक हालचाली करा तासनतास एकाच जागेवर बसून मुले मोबाइलमध्ये डोके घालून बसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे मुलांना व्यायाम, विविध खेळ खेळण्याला प्रोत्साहन द्यावे.