Inverter vs Non Inverter AC: उकाडा वाढला! एसी घेताय? इन्व्हर्टर एसी आणि नॉन इन्व्हर्टर एसीमध्ये फरक काय? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:21 PM 2022-03-21T13:21:54+5:30 2022-03-21T13:29:29+5:30
Inverter vs Non Inverter AC difference in Marathi: राज्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. महिनाभरापूर्वी जिथे थंडीची झुळूक होती, तिथे आता उष्णतेची लाट आली आहे. उनातच नाही तर रात्रीच्या अंधारातही अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. यामुळे लोकांची पाऊले आता एसीकडे वळू लागली आहेत. अनेकांनी जुने एसी दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. तर अनेकांनी वीज बिल कमी करणारे एसी घेण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.
जर तुम्ही देखील एसी घेण्याचा विचार करत असाल तर पाच दहा हजाराचा विचार करून साधा एसी घेण्याच्या फंदात पडू नका. इन्व्हर्टर एसीबाबत अनेक गैरसमज आहेत. ते आधी दूर करा, विज बिलात पैसे वाचतील आणि फायदाही होईल.
महत्वाचे म्हणजे हा एसी तुमच्या घरातील वीज गेल्यावर जो इन्व्हर्टर आहे त्यावर चालत नाही. तर त्यात जी टेक्नॉलॉजी आहे तिचे नाव इन्व्हर्टर आहे.
काय आहे हे इनव्हर्टर तंत्रज्ञान एसीमध्ये इन्व्हर्टर प्रणाली ही इलेक्ट्रिक व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी यासाठी नियंत्रकाचे काम करते. इन्व्हर्टर AC च्या काँप्रेसरला होणाऱ्या वीजपुरवठ्यात परस्पर गरजेनुसार हस्तक्षेप करते. तसेच थंड हवा किती प्रमाणात सोडायची, कधी थांबवायची याचे नियोजन करते.
नॉन-इन्वर्टर एसीमध्ये काँप्रेसर चालू बंद होतात. म्हणजेच तुमच्या खोलीतील तापमान कमी जास्त झाले की काँप्रेसर चालू किंवा बंद होतो. यासाठी वीज मोठ्याप्रमाणावर लागते. तापमान वाढले की परत ते ठराविक तापमानाला नेऊन ठेवण्यासाठी काँप्रेसर पळू लागतो.
उलट इन्व्हर्टर एसी एकाच वेगाने थंड हवा सुरु ठेवतो. तो रुमचे तापमान कमी, जास्त होऊ देत नाही. म्हणजेच आतील थंडावा स्टेबल राहतो. यामुळे काँप्रेसरला अचानक तापमान खाली वर झाल्याचा शॉक बसत नाही.
आधुनिक इन्व्हर्टर एसी R32 रेफ्रिजरंट वापरतात जे केवळ चांगली थंड करण्याची क्षमताच देत नाही तर हानिकारक उत्सर्जन देखील कमी करते.
इन्व्हर्टर एसी साधारणपणे नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा महाग असतात. तथापि, दीर्घकाळासाठी त्यांचा ऑपरेटिंग खर्च कमी असतो, कारण ते आवश्यकतेनुसार उच्च आणि कमी दोन्ही क्षमतेवर काम करू शकतात.
ऑपरेटिंग पद्धतीमुळे, इन्व्हर्टर एसीमधील कंप्रेसर अधिक टिकाऊ असतात आणि नॉन-इनव्हर्टर एसीपेक्षा जास्त काळ टिकतात.
इन्व्हर्टर एसीमध्ये नॉन-इन्व्हर्टर एसी पेक्षा कमी आवाज असतो. हायटेक इन्व्हर्टर एसीमध्ये पर्याय म्हणून स्लीप मोड किंवा क्वाईट मोड देखील आहे. परंतू इन्व्हर्टर एसीला मेन्टेनन्स कॉस्ट अधिक असू शकते.