प्रत्येकाचा डिजिटल आयडी बनणार! पॅन, आधार कार्डपासून ड्रायव्हिंग लायसन्स अन् पासपोर्टपर्यंत सर्वच लिंक होणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:23 PM 2022-01-30T16:23:39+5:30 2022-01-30T16:34:00+5:30
देशातील प्रत्येक नागरिकाचा एक डिजिटल आयटी असावा यावर केंद्र सरकार बऱ्याच कालावधीपासून विचार मंथन करत आहे. आता यावर वेगानं काम होण्याची शक्यता आहे. डिजिटल आयडी नेमकं काय काम करणार हे जाणून घेऊयात... येत्या काळात देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा एक विशिष्ट असा डिजिटल आयडी (Digital ID) दिला जाईल. या आयडीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सपासून पासपोर्ट नंबर व आधार कार्ड देखील लिंक केलं जाणार आहे.
सर्व महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे एकमेकांशी लिंक झाल्यानं देशातील नागरिकांना देखील खूप सोयीचं ठरणार आहे. आधार, पॅन किंवा लायसन्सच्या व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळे आयडी देण्याची गरज भासणार नाही.
डिजिटल आयडीच्या या नव्या तंत्रज्ञानावर इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय सध्या काम करत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लवकरच हा प्रस्ताव सार्वजनिक केला जाण्याची शक्यता असून २७ फेब्रुवारीपर्यंत यावर नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली जाईल.
जनतेच्या अभिप्रायानुसार प्रस्तावात आवश्यक ते बदल करुन डिजिटल आयडीवर सरकार काम करण्याची शक्यता आहे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी विशिष्ट डिजिटल आयडी असावा यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय प्रयत्नशील आहे. मंत्रालयानं या मॉडलचं नाव 'फेडरेटेड डिजिटल आयडेन्टिटीज' असं दिलं आहे.
फेडरेटेड डिजिटल आयडेन्टिटीज मॉडल अंतर्गत वेगवेगळ्या आयडी एकत्र जोडून एक आयडी तयार केला जाईल आणि तो प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला जाईल. यात पॅन, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसारखे महत्त्वाचे कागदपत्रं एकाच डिजिटल आयडीमध्ये लिंक करण्यात येतील.
डिजिटल आयडीमुळे नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होतील असं माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. कोणत्याही कामासाठी ज्या कागदपत्राची आवश्यकता असेल केवळ त्याच कागदपत्राची सविस्तर माहितीचा अॅक्सेस डिजिटल आयडीच्या माध्यमातून केला जाईल.
एखाद्या रजिस्ट्रारच्या एका किल्ली प्रमाणे डिजिटल आयडी काम करेल जिथं राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व आयडी स्टोअर केल्या जातील. डिजिटल आयडीच्या मदतीनं लोक थर्ड पार्टी सेवा देखील मिळवू शकतील. यासाठी केवळ त्यांना केवायसी डिटेल्स भरावे लागतील.
समजा एखाद्याचा आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि लायसन्स नंबरला एकत्र आणायचं असेल तर डिजिटल आयडीमध्ये याचा समावेश करण्या येईल. सध्या लोकांना या तिन्हीसाठी वेगवेगळे नंबर द्यावे लागतात. पण डिजिटल आयडीमध्ये तसं नसेल. केवळ एका आयडीवर तुमचं सारंकाम होऊन जाईल.
डिजिटल आयडीमध्ये काय असणार? डिजिटल आयडी प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट आयडी असेल त्याचं दुसऱ्या कुणाच्याही आयडीशी साधर्म्य असणार नाही. परदेशात अशा आयडीचा वापर देखील केला जात आहे. केंद्र सरकारकडून यावर खूप आधीपासूनच विचार केला जात होता. कारण अशापद्धतीचा युनिक आयडी तयार झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी खूप फायदा होईल. बनावट कागदपत्रांचा घोटाळा, भ्रष्टाचार देखील थांबेल. तसंच वेगवेगळी कागदपत्रं सादर करण्याच्या त्रासातून जनतेची मुक्तता होईल.