Facebook चा संस्थापक मार्क झुकरबर्गचा दिनक्रम काय असतो? दिवसभरात नेमकं काय करतो? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:18 PM 2021-10-26T17:18:47+5:30 2021-10-26T17:23:04+5:30
Facebook चे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Elliot Zuckerberg) आज एक यशस्वी व्यक्तीमत्व असून अनेकांचं प्रेरणास्थान आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या लाइफस्टाइलचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. आज आपण मार्क झुकरबर्गच्या दिनक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत. फेसबुकवर आज कोट्यवधी युझर्स आहेत. तरुणाईत अत्यंत लोकप्रिय असलेल्या फेसबुक या सोशल मीडिया अॅपनं अल्पावधीत खूप मोठं यश कमावलं. याचं सारं श्रेय फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला जातं. झुगरबर्गच्या सुरुवातीच्या काळातील अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. पण त्याचा सध्याचा दिनक्रम नेमका कसा असतो हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
आपण एका बड्या कंपनीचे सीईओ असलो तरी त्याआधी एक सर्वसामान्य नागरिक आहोत याची जाणीव मार्क झुकरबर्गला आहे. हे त्याच्या लाइफस्टाइलवरुनच लक्षात येतं. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणंच त्याच्या दिवसाची सुरुवात होते.
मार्क झुकरबर्ग सकाळी ८ वाजता उठतो. त्यानंतर पहिलं तो आपला मोबाइल हातात घेतो आणि सर्व नोटिफिकेशन्स चेक करतो. यात फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप पाहतो. याची माहिती खुद्द झुकरबर्ग यानंच Jerry Seinfeld च्या एका फेसबुक लाइव्हमध्ये दिली होती.
सकाळी उठल्यानंतर तो वर्क आउट देखील करतो. पण तो दररोज वर्कआऊट करत नाही. आठवड्यातून फक्त तीन वेळा झुकरबर्ग व्यायाम करतो. इतर तीन दिवस तो आपल्या लाडक्या श्वानासोबत मॉर्निंग वॉकला जातो.
व्यायाम आणि वॉक झाल्यानंतर तो ब्रेक फास्ट करतो. ब्रेक फास्टसाठी त्याचे काही ठराविक असे नियम नाहीत. जे किचनमध्ये तयार केलं जातं ते तो आवडीनं खातो.
लहान-लहान गोष्टींवर निर्णय घेण्यास वेळ वाया घालवू नये असं त्याला वाटतं. त्यामुळेच तो दररोज एकाच रंगाचं टी-शर्ट परिधान करतो. करड्या रंगाचं टी-शर्ट, जीन्स आणि शूज हा झुकरबर्गचा रोजचा ठरलेला वर्किंग युनिफॉर्म आहे. याबाबत एकदा झुकरबर्गला विचारण्यात आलं असता त्यानं लक्षवेधी उत्तर दिलं होतं.
मी माझं आयुष्य खूप सरळ साधं आणि स्पष्ट ठेवू इच्छितो जेणेकरुन मला कमीत कमी निर्णय घ्यावे लागतील. संपूर्ण लक्ष्य समाजाप्रती काहीतरी करण्यावर भर देण्यावर असतं, असंही तो म्हणाला होता.
झुकरबर्ग एका आठवड्यात जवळपास ५० ते ६० तास फेसबुकसाठी देतो. सोशल मीडिया व्यासपीठासाठी काहीतरी नवं करण्याचे विचार नेहमी त्याच्या डोक्यात सुरू असतात. जगाशी कशापद्धतीनं संपर्कात राहून नवं काय करता येईल याचाच विचार सुरू असतो, असं त्यानं cnn ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळेल असा त्याचा उद्देश असतो. सध्या तो Mandarin Chinese शिकत आहे. तसंच तो जास्तीत जास्त पुस्तकं वाचतो. २०१५ साली त्यानं प्रत्येक दोन आठवड्यात नवं पुस्तक वाचून काढायाचं असं स्वत:लाच चॅलेंज दिलं होतं.
झुकरबर्गचा दिनक्रम त्याच्या ट्रॅव्हल शेड्युलवरही निर्भर असतो. झुकरबर्गच्या वारंवार अमेरिका दौऱ्यानं आगामी काळात तो राजकारणात दिसू शकतो असं काही लोक म्हणतात. पण दिवसाचा प्रवास आणि काम संपलं की तो आपल्या पत्नी व मुलांसोबत वेळ व्यतित करणं अधिक पसंत करतो.