FaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 09:51 AM 2019-07-22T09:51:25+5:30 2019-07-22T09:57:50+5:30
सोशल मीडियावर दर दिवशी काही ना काही ट्रेंड असतोच असतो. काहीवेळा हा ट्रेन्ड संकटात टाकतो, काही वेळा फाय़द्याचा ठरतो. सोशल मीडियामुळे अनेकांचे संसारही वाचले आहेत. सध्या सोशल मीडियावर म्हातारे दिसण्याचा ट्रेन्ड चालत आहे. हे अॅप आहे फेस अॅप. या अॅपवर माहिती चोरण्याचाही आरोप होत आहे. मात्र, ही बातमी वाचाल तर या अॅपमुळे झालेला फायदाही लक्षात येईल.
फेस अॅपमुळे खासगीपणा धोक्यात असल्यावरून वादळ उठले आहे. अमेरिकेच्या खासदाराने या प्रकरणी एफबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या अॅपच्या मदतीने चीनच्या एका कुटुंबाचे आयुष्य़च बदलले आहे. त्यांचा तीन वर्षांचा 18 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्याला त्यांचा जवळपास दोन दशकांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला आहे. त्याचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाचे तीन वर्षांचा असताना अपहरण करण्यात आले होते.
हे अॅप आल्यानंतर पोलिसांच्या मनात विचार आला की या मुलाचा लहानपणीचा फोटो या अॅपवर शेअर केला तर...आज तो मुलगा कसा दिसत असेल हे समजेल.
यानंतर पोलिसांनी तो जुना फोटो फेसअॅपसमोर धरून त्याचा तरुण वयातील फोटो मिळवला. हे अॅप चीनच्याच कंपनीने बनविले आहे. या कंपनीचे नाव टेनसेंट असे आहे. पोलिसांनी या मुलाचा तीन वर्षांचा फोटो हाय अॅक्युरेसीमध्ये डेव्हलप केला. कोणतीही चूक होऊ नये यासाठी पोलिसांनी एआय लॅबच्या अल्गोरिदमप्रमाणे फेशिअल रिकग्निशन तंत्रज्ञानाशी फोटो जुळविला.
सॉफ्टवेअरच्या मदतीने जवळपास 100 लोकांची पडताळणी करण्यात आली. यानंतर अपहरण झालेला मुलगा यू विफेंग हा कॉलेजमध्ये शिकत असल्याचे समोर आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी झेंग झेनहाई यांनी सांगितले की, जेव्हा विफेग मिळाला तेव्हा त्याने अपहरण झाल्याचे फेटाळले. पण जेव्हा त्याचा डीएनए त्याच्या आईवडीलांशी जुळला तेव्हा सर्व स्पष्ट झाले.
पोलिस अधिकारी झेंग यांनी सांगितले की, या मुलाचा शोध गेल्या 18 वर्षांपासूनच घेतला जात होता. मात्र, कधी आशा सोडली नव्हती.
विफेंग हा 2001 मध्ये एका निर्माणाधीन इमारतीजवळून गायब झाला होता. तो खेळत होता. आता त्याच्या पालकांनी त्याला सांभाळणाऱ्य़ा दांपत्याचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की आता विफेंगला दोन वडील आहेत.