आला जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन; साईज ATM कार्डापेक्षाही कमी

By जयदीप दाभोळकर | Published: August 8, 2021 11:19 AM2021-08-08T11:19:05+5:302021-08-08T11:26:01+5:30

कंपनीनं लाँच केलेला हा स्मार्टफोन जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. या फोनचं वजनही आहे सर्वात कमी.

अनेक ग्राहकांना सध्या मोठे डिस्प्ले असलेले आणि कमी बेझल्स असलेले स्मार्टफोन पसंतीस पडताना दिसतात. सध्या बाजारात 6.5 इंचाचे डिव्हाईस तर सर्वसामान्य झाले आहे.

अशातच चीनच्या एका कंपनीनं जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीनं केवळ 3 इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

हा स्मार्टफोन चीनची कंपनी Mony नं लाँच केला आहे आणि कंपनीनं या स्मार्टफोनला Mony Mint असं नाव दिलं आहे. हा स्मार्टफोन छोटा असण्यासोबतच वजनालाही हलका आहे.

मोनी मिंट स्मार्टफोन ट्रॅव्हलिंगदरम्यानही कॅरी करणं सोपं आहे. याशिवाय हा स्मार्टफोन जगभरातील सर्व प्रमुख कॅरिअर्सना सपोर्ट करतो.

दिसण्यात हा स्मार्टफोन एखाद्या एटीएम कार्डापेक्षाही छोटा आहे. स्मार्टफोनमध्ये बटण आणि पोर्ट्सही छोटे देण्यात आले आहेत. यामध्ये युएसबी टाईप सी पोर्ट, वॉल्युम आणि पॉवर बटण देण्यात आली आहेत.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. हे स्टोरेज एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 164 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन असून यात काही अॅप्स पहिल्यापासूनच इन्स्टॉल करण्यात आले आहेत.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये वायरलेस कॉलिंग अशी सुविधाही देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी या सुविधेचा ग्राहकांना वापर करता येऊ शकतो.

स्मार्टफोनमध्ये 1250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज झाल्यानंतर 3 दिवसांपर्यंत सुरू राहू शकते.

मोनी मिंट या स्मार्टफोनची किंमतही कमी आहे. या स्मार्टफोनची किंमत 150 डॉलर्स म्हणजे जवळपास 11 हजार रूपये इतकी आहे. हा स्मार्टफोन अमेरिकन क्राऊडफंडिंग वेबसाईट Indiegogo द्वारे खरेदी केला जाऊ शकतो.

सुरूवातीला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा स्मार्टफोन ऑफर अंतर्गत 100 डॉलर्स म्हणजेच जवळपास 7400 रूपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनची विक्री नोव्हेंबर 2021 पासून सुरू केली जाणार आहे.