Paytm Spoof Scam: Paytm वापरता? मग सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक; वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:27 PM 2022-01-07T19:27:08+5:30 2022-01-07T19:35:59+5:30
देशातील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप म्हणून ओळख असलेल्या Paytm चं एक स्पूफ (Spoof) सध्या तुफान व्हायरल झालं आहे. यापासून सावध राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात... Paytm हे लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप असून देशात Paytm चे कोट्यवधी युझर्स आहेत. सध्या Paytm Spoof नावानं सध्या युजर्सला गंडा घालता जातो आहे. Paytm Spoof हे एक फ्रॉड अॅप असून यामाध्यमातून ग्राहकांना फसवण्याचं काम केलं जात आहे.
मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत Paytm Spoof अॅप दिसून येत आहे. हे अॅप नेमकं कसं काम करतं याची माहिती यात देण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारांनी या अॅपचा वापर खासकरुन दुकानदारांना फसवण्यासाठी केला जात आहे. दुकानदारांसोबतच सामान्य ग्राहकांनाही यातून फसवलं जाऊ शकतं.
पेटीएमच्या अधिकृत अॅपसारखंच हे फेक अॅप दिसतं. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडतो. फेक अॅप देखील खऱ्याखुऱ्या अॅपप्रमाणेच काम करतं. उदाहरणार्थ: जेव्हा तुम्ही एखाद्याला पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवता तेव्हा पेमेंट यशस्वी झाल्यावर पैसे पाठवणाऱ्याच्या होम स्क्रीनवर त्यानं केलेल्या व्यवहाराशी निगडीत संपूर्ण माहिती दिसते. यात किती पैसे पाठवले?, ट्रान्झाक्सन आयडी आणि इतर माहिती दिसते.
पेटीएमध्ये ज्यापद्धतीनं पैसे पाठवल्यानंतर स्क्रिनवर मेसेज येतो त्याचपद्धतीचा मेसेज या फेक अॅपवरही दिसून येते. पेटीएमचं हे स्पूफ अॅप सध्या खूप व्हायरल झालं आहे.
कसं काम करतं Paytm Spoof अॅप? या अॅपची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर नमूद करावा लागतो. त्यानंतर त्याचं नाव नमूद करावं लागतं आणि किती पैसे पाठवायचे आहेत त्याची माहिती भरावी लागते. यात वेळ आणि तारीख देखील नमूद करावी लागते.
सर्व माहिती सबमिट केल्यांतर पेटीएम ट्रान्झाक्शनचं एक फेक अॅनिमेशन तयार होतं. ही स्क्रीन दुकानदाराला दाखवली की समोरच्या व्यक्तीला व्यवहार यशस्वी झाल्यानं तो आश्वस्थ होतो. पण मूळात व्यवहार पूर्ण झालेलाच नसतो. आता अशापद्धतीच्या फ्रॉडमुळे दुकानदारांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Paytm Spoof अॅप खरंतर अगदीच Paytm च्या अधिकृत अॅपसारखं दिसत नाही. पण त्यात संपूर्ण माहिती नमूद करण्याची पद्धत आणि त्यानंतर दिसणारा मेसेज व स्क्रिन अगदी पेटीएम सारखीच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा घोळ होऊ शकतो.
फ्रॉडपासून कसं वाचावं? जर तुम्ही दुकानदार असाल आणि ग्राहकांकडून पेटीएमनं पैसे स्वीकारत असाल तर सतर्क राहणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही दुकानात पेटीएम डिव्हाईस Soundbox 2.0 वापरू शकता. हे डिव्हाइस म्हणजे एक स्पिकर असतो. यात पेटीएमवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारानंतर तुम्हाला पैसे प्राप्त झाले का आणि किती पैसे प्राप्त झाले याची तात्काळ माहिती देतं.
या डिव्हाइसमध्ये एक छोटी स्क्रिन देखील असते. यात तुम्हाला पैसे प्राप्त झाले आहेत का याची सविस्तर माहिती मिळते. यात संपूर्ण दिवसभरात झालेल्या व्यवहारांचीही माहिती मिळते. डिव्हाइसवर काही बटणं देखील देण्यात आली आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही आवश्यक अशी सर्व माहिती मिळवू शकता.
तुमच्याकडे हे डिव्हाइस नसेल तर किमान प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या अधिकृत मोबाइल क्रमांकावर येणारा मेसेज काळजीपूर्वक तपासणं आणि पडताळणी करणं गरजेचं आहे.