अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:51 PM 2023-03-02T12:51:08+5:30 2023-03-02T13:08:11+5:30
मोबाईल हाताळताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये ६८ वर्षे वय असलेल्या दयाराम बारोड यांचा मोबाईलचा स्फोट होऊन सोमवारी मृत्यू ओढवला. दयाराम घरातच मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलत होते. तेव्हाच हा प्रकार घडला. स्फोटात त्यांचे डोके, हात आणि छातीचे तुकडे झाले होते.
स्फोटासाठी बॅटरी किती कारणीभूत ? मोबाईल हाताळताना त्यामुळेच योग्य काळजी घेतली गेली पाहिजे, ही बाबा अधोरेखित झाली आहे. फोनमधील बॅटरी हेच स्फोटाचे मुख्य कारण असते. गरम झाल्याने बॅटरी फुटण्याची भीती असते.
बॅटरी गरम होण्याच्या आणि परिसरातील उष्णतेचा काहीही संबंध नसतो. इतर कोणत्याही कारणाने बॅटरीचे तापमान वाढू शकते. चार्जिंग करतेवेळी मोबाईलच्या आसपास रेडिएशनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बॅटरी गरम होते.
युजरच्या चुकीमुळे बॅटरी क्षमतेपेक्षा अधिक तापल्याने फुटू शकते. बॅटरीचे सेल खराब होत असतात. त्यामुळे बॅटरीमध्ये रासायनिक बदल होतात व फुटण्याची शक्यता वाढते. शॉर्ट सर्किटमुळे बॅटरी फुटू शकते. गरम झालेली बॅटरी थंड करण्याची सोय काही फोनमध्ये असते. ती लवकर थंड झाली नाही तर मात्र फुटण्याची शक्यता वाढते.
प्रोसेसरमुळे स्फोट होतो काय? हल्ली मोबाईलमध्ये उच्च क्षमतेचे प्रोसेसर वापरले जातात. बॅटरीच्या बाजूला बसवलेले प्रोसेसरही गरम होत असतात. त्यामुळे मोबाईलमध्ये स्फोटाची शक्यता वाढते. काही कंपन्या प्रोसेसरच्या बाजूला उष्णताशोषक बसवतात. त्यामुळे मोबाईल लवकर थंड होण्यास मदत होते.
मोबाईल स्फोटापासून स्वत:चे रक्षण कसे कराल? फोनमध्ये मोठ्या संख्येने एप डाऊनलोड करू नका. त्यामुळे फोनवर ताण येतो. अनावश्यक एप्लीकेशन डिलीट करून टाका.
अनेकांना फोन बाजुला ठेवून झोपण्याची सवय असते. पण झोपताना मोबाईल कधीही उशीखाली ठेवू नका. ओव्हर चार्जमुळे बॅटरी खराब होते.
मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईलमधील उष्णता बाहेर पडत नाही
गरमीच्या दिवसात बंद कारमध्ये मोबाईल ठेवू नका. सलग दोन-तीन तास मोबाईल कानाला लावून बोलू नका. इंटरनेट वापरताना, बोलताना मोबाईल गरम झाला तर वापर थांबवा.
खूप वेळ बोलायचे असेल तर हेडफोनचा वापर करा. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्यावर बोलू नका आणि गेमही खेळू नका.
कधीही डुप्लिकेट चार्जर वापरू नका. मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करणे गरजेचे आहे.. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते.
अती तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे मोबाईल टीव्ही, फ्रीज अथवा अन्य इलेक्ट्रीक वस्तूंजवळ ठेवू नका. उन्हामध्ये फोन गरम होतो. काम नसेल तर काही काळ फोन बंद ठेवा. त्यामुळे मोबाईलचे तापमान नियंत्रणात राहते.