Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी घ्या या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान By सिद्धेश जाधव | Published: December 10, 2021 06:37 PM 2021-12-10T18:37:34+5:30 2021-12-13T13:02:13+5:30
Smartphone Tips: बिघडलेला फोन लवकर दुरुस्त व्हावा हे प्रत्येकाला हवं असतं. परंतु लवकरात लवकर फोन मिळावा म्हणून आपण घाई-घाईत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देतो आणि या 10 चुका करतो. स्मार्टफोन बिघडल्यावर तो सर्व्हिस सेंटरमध्ये दिला जातो. लवकर फोन मिळावा म्हणून घाई घाईत बऱ्याच चुका होतात. या चुकांचा परिणाम तुमचा डेटा, खाजगी फोटो-व्हिडीओ आणि बँकिंग इन्फॉर्मेशनवर देखील होऊ शकतो. पुढे आम्ही अशा गोष्टींची माहिती दिली आहे ज्यांची काळजी तुम्ही स्मार्टफोन दुरुस्तीला देताना घेतली पाहिजे.
डेटाचा बॅकअप घेणे सर्विस सेंटरमध्ये Smartphone देण्याआधी आठवणीनं Phone Backup घ्यावा. हा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन क्लाउड सर्विस, पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्कचा वापर करू शकता. मीडिया फाईल्सचा बॅकअप सर्वच घेतात, पण कॉन्टॅक्टस, व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस आणि कॉल लॉगचा देखील बॅकअप घेता येतो, हे अनेकांना माहित नसतं.
बिघाडाचे कारण विचारा सर्विस सेंटरमध्ये फोन जमा करताना फोन का बिघडला आहे हे विचारा म्हणजे भविष्यात तुम्हाला तशी काळजी घेता येईल. तसेच लवकरात लवकर फोन परत मिळेल यासाठी प्रयत्न करा. कारण जेवढा वेळ फोन सर्विस सेंटरमध्ये राहिली तेवढा वेळ चुकीच्या हाताळणीमुळे फोनचे अजून नुकसान होऊ शकतं.
खाजगी मीडिया डिलीट करा आपल्या स्मार्टफोनमध्ये खाजगी फोटोज-व्हिडीओज असतात. या फाईल्स चुकीच्या लोकांच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे बॅकअप घेऊन झाल्यानंतर अशा फाईल्स डिलीट करायला विसरू नका.
मेमरी आणि सिम कार्ड काढण्यास विसरू नका स्मार्टफोनमधील छोट्याश्या सिम कार्ड आणि मेमरी कार्डमध्ये देखील तुमची बरीचशी माहिती असते. फक्त सिम कार्डच्या मदतीनं लोक तुमची ओळख चोरू शकतात. त्यामुळे या दोन महत्वाच्या वस्तू मोबाईल रिपेयरिंगला देण्याआधी ताब्यात घेणं आवश्यक आहे.
समस्यांची यादी बनवा समस्यांची यादी बनवा फोनमध्ये छोट्या छोट्या समस्या नेहमीच येत असतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मोठी समस्या येते तेव्हाच आपण सर्विस सेंटरमध्ये नेतो. जर तुम्ही सर्विस सेंटरमध्ये फोन देणार असाल तर सर्व समस्यांची यादी बनवा. म्हणजे एकाच फेरीत सर्व समस्या सुटतील.
महत्वाचे मेसेज काढून टाका महत्वाचे मेसेज काढून टाका व्हॉट्सअॅप तसेच एसएमएस मधील महत्वाचे मेसेजेस डिलीट करायला विसरू नका. तुमच्या बँक अकॉउंटची महत्वाची माहिती तुमच्या मोबाईलवर येत असते हे विसरू नका. एक-एक करून एसएमएस शोधणं कठीण असेल तर मेसेजिंग अॅपचा डेटा क्लियर करून तुम्ही सर्व मेसेजेस डिलीट करू शकता. व्हॉट्सअॅपवर देखील चॅट क्लीयर करण्याचा पर्याय मिळतो.
फोन नीट तपासा सर्विस सेंटरमध्ये फोन जमा करण्याआधी फोन नीट तपासा. स्क्रीनवर किती स्क्रॅच आहेत, बॉडी कशी आहे इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्या. असे केल्यास फोन परत मिळाल्यावर त्याला झालेल्या नुकसानीचा जाब विचारता येईल. जमल्यास फोनचे एक दोन फोटो घ्या.
बँकिंग आणि पेमेंट अॅप्स आपल्या स्मार्टफोनमधील बँकिंग अॅप्स आणि पेमेंट अॅप्स खूप उपयुक्त तर असतात पण जेव्हा हे अॅप्स चुकीच्या माणसाच्या हातात गेले तर आपल्याला रस्त्यावर देखील आणू शकतात. त्यामुळे सर्व्हिस सेंटरवर स्मार्टफोन देताना असे अॅप्स अनइन्स्टॉल करायला विसरू नका.
सोशल मीडिया अॅप्सचं काय करायचं? Facebook, Twitter, Instagram आणि WhatsApp यासाठीच तर अनेकजण स्मार्टफोन वापरत असतात. या अॅप्सवरील प्रोफाइल म्हणजे युजर्सची एकप्रकारे ओळख असते. त्यामुळे इथे एखादी चुकीची पोस्ट ती ओळख बदलून टाकू शकते. सर्विस सेंटरमध्ये फोन देण्याआधी हे सर्व अकॉउंट्स लॉग-आउट करायला विसरू नका.
खर्चाची चौकशी आधीच करावी फोनची समस्या तुम्हाला माहीत असेल तर आधीच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काढावी. यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. सर्विस सेंटरमध्ये जाण्याआधीच माहिती मिळवल्यास तुमच्याकडून छोट्याश्या गोष्टीसाठी अवाढव्य पैसे उकळले जाणार नाहीत.