आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड? By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:55 PM 2019-01-31T14:55:32+5:30 2019-02-01T19:09:14+5:30
आजपासून जेवढे चॅनेल पाहता, तेवढ्याच चॅनलचे पैसे द्यावे लागणार आहेत. डीटीएच कंपन्या भारंभार चॅनेल दाखवून लूट करत असल्याच्या तक्रारी देशभरातून ट्राय़कडे केल्या जात होत्या. यावर ट्रायने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बघत असलेल्या चॅनलचेच पैसे आकारण्याचे नियम बनविला आहे. हा नवा नियम आज म्हणजचे 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम असून फायद्या-तोट्यापेक्षा हे चॅनल कसे निवडावेत याबाबतचे मार्गदर्शन 'लोकमत'च्या वाचकांना करत आहे.
ट्रायच्या निर्णयानुसार एफटीए (FTA किंवा NCF) म्हणजेच फ्री टू एअर चॅनेलसाठी 130 रुपये आणि जीएसटी असे 154 रुपयांमध्ये 100 चॅनेल्स मिळणार आहेत. आणखी 50 चॅनेलपैकी पहिल्या 25 चॅनेलसाठी 23 रुपये जीएसटीसह मोजावे लागणार आहेत. यामध्ये डीडीचे 28 चॅनल आणि देशातील अन्य भाषा, संगीत व इतर श्रेणीतील उर्वरित चॅनेल असणार आहेत.
टाटा स्काय, डिश टीव्ही, एअरटेल, बिग टीव्हीच्या ग्राहकांना त्या कंपन्यांनी आधीच्या पॅकेजनुसार चॅनेलचे पॅकेज सुचविलेले आहे. तसेच तुम्हाला हवे असलेले चॅनेलही एकेक असे निवडता येणार आहेत. याशिवाय कंपन्यांनी बकेट या नावाने काही चॅनेल आलटून पालटून निवडच पॅकेज बनविलेली आहेत. यानुसार तुम्हाला पसंतीचे चॅनेल निवडावे लागणार आहेत.
100 चॅनेलमध्ये कोणते चॅनेल मिळणार? यामध्ये मराठीचे फक्त 4 चॅनेल्स आहेत. यामुळे झी, स्टार, कलर्सचे मराठी चॅनेल घेण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय मिळणार आहेत.
केवळ एचडी चॅनेलही निवडता येणार आहेत. ही प्रक्रिया हिंदी, मनोरंजन, स्पोर्ट सारख्या चॅनेलसाठीही करावी लागणार आहे.
रेकमेंडेड पॅक्स डीटीएच कंपन्यांनी तुमच्या आधीच्या पॅकेजनुसार चॅनल निवडून ही पॅक बनविलेली आहेत. यामध्ये किडस्, स्पोर्ट, रिजनल आणि अन्य चॅनेल घेऊन ही पॅक निवडलेली आहेत. सहाजिकच किंमतीला आधीपेक्षा जास्त असलेली ही रेकमेंडेड पॅक आहेत. तसेच किंमतीही दिलेल्या आहेत.
यामध्ये पॅकचे नाव, त्यामध्ये येणार चॅनेल पाहायचे असतील तर उग्दार चिन्हावर माऊसचा कर्सर न्यावा लागणार आहे. याची गोळाबेरीज करून खाली तुम्हाला ते पॅकेज कितीला बसेल याची किंमत दिलेली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये काही चॅनेल तुम्ही न पाहत असलेले किंवा पाहत असलेले चॅनेल नसण्याचीही शक्यता आहे. यामुळे नसलेले चॅनेल निवडल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
बकेट पॅक्स कंपन्यांनी ट्रायच्या नियमानुसार चार ते 10 चॅनेल घेऊन अनेक छोटी छोटी बकेट पॅकेज बनविली आहेत. चॅनलवनुसार या बकेटची किंमतही बदलत आहे. यातील काही चॅनेल तुम्ही पाहतही नसाल तरीही ते तुम्हाला देण्यात येत आहेत. म्हणजे रेकमेंडेड पॅक्स आणि बकेट पॅक्समध्ये तुम्हाला काही चॅनेल बळजबरीने घ्यावे लागणार आहेत. हा पूर्वीसारखाच प्रकार आहे. यामध्ये ग्राहकाला काहीही फायदा होणार नाही. मात्र, जर या बकेटमधील सर्व चॅनेल जर तुम्ही पाहत असलेलेच असतील तर ते तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे. यासाठी प्रत्येक बकेट खोलून त्यामध्ये दिलेले चॅनेल पाहावेत आणि ते बकेटच निवडावे.
ब्रॉडकास्टर्स पॅक्स सोनी, स्टार, झी असे चॅनेलची श्रुंखला असलेले ब्रॉडकास्टर्स आहेत. या बॉडकास्टर्सनी त्यांचे चॅनेल होलसेलमध्ये पॅक बनवून ठेवले आहेत. जर तुम्ही झीच्या मराठी हिंदी चॅनल पाहणार असाल तर एकेक निवडण्यापेक्षा एकत्र बनविलेले पॅकेज स्वस्त पडणार आहे. मात्र, एखाद दुसरा चॅनेल पाहणार असाल तर तुम्हाला खालील अ-ला कार्टे उपयोगी पडणार आहे.
अ- ला कार्टे पॅक्स अ- ला कार्टे पॅकमध्ये तुम्हाला एकेक चॅनेल निवडता येणार आहे. या चॅनेलची किंमत 0 ते 19 रुपये ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये एचडी आणि एसडी म्हणजेच हाय डेफिनेशन आणि स्टँडर्ड डेफिनेशन चॅनेल देण्यात आलेले आहेत. जे चॅनल हवे आहेत त्या चॅनेलच्या आयकॉनवर क्लिक करून निवडावे लागणार आहे. या चॅनेलची किंमत मूळ एफटीए किंवा एनसीएफ (FTA किंवा NCF) च्या किंमतीमध्ये जमा केली जाणार आहे. या चॅनेलच्या किंमतीवर जीएसटी लावला जाणार आहे. ही एकूण असलेली रक्कम तुम्हाला रिचार्ज करावी लागणार आहे.
तुम्हाला कितीचे रिचार्ज करावे लागेल...असा पहा डेमो... https://bit.ly/2SeHcQW