दोन तरुणांनी Yahoo चा गेम ओव्हर केला; वेबसाईट विकायला गेले होते, सिकंदर बनले, गोष्ट आहे गुगलची
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 23:44 IST2025-01-22T23:31:53+5:302025-01-22T23:44:13+5:30
Google: स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना दोन तरुणांना सर्च इंजिन सुरू करण्याची कल्पना सुचते, ते तरुण त्यावर काम करतात आणि सुरुवात होते गुगल सर्च इंजिनची.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना, लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांना इंटरनेटवर माहिती शोधणे खूप सोपे करणारे सर्च इंजिन तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली आणि १९९८ मध्ये, एका कंपनीचे सह-संस्थापक अँडी बेचटोलशेम यांनी त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवला आणि १००,००० डॉलरची गुंतवणूक केली. यातुनच पुढे गुगलची सुरुवात झाली.
त्यांनी गुगल ही सर्च इंजिन सुरू केले, त्याच वर्षी त्यांनी Yahoo कंपनी गाठली आणि त्यांनी बनवलेले सर्च इंजिन त्यांना दाखवले. यावेळी त्या दोघांनीही आपला पेजरपॅक सिस्टीम फक्त १ मिलियन डॉलरला विकण्याबाबत चर्चा केली. पण दुर्दैवाने, Yahoo कंपनीला या गुगल सर्च इंजिनचे महत्व कळाले नाही.
त्यावेळी याहूला हा करार महागडा वाटला. त्यांनी लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांची ऑफर नाकारली. लॅरी आणि ब्रिन यांना कंपनी विकायची होती ती लवकरच पेटंट होणारी पेजरँक सिस्टीम होती आणि ही गुगलची सुरुवात होती, त्यांनी तंत्रज्ञानाचे जगच बदलून टाकले.
त्या काळात याहू हे सर्वात मोठे सर्च इंजिन होते. वापरकर्त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती. तर पेजरँक सिस्टीम अगदी उलट होती. ते वापरकर्त्याच्या शोधावर आधारित सर्वात संबंधित साइट निवडते आणि तुम्हाला देते. आता वापरकर्त्याने कोणत्या साइटला भेट द्यायची हे ठरवायचे आहे. याच कारणास्तव त्यांनी गुगल खरेदी करण्यात रस दाखवला नाही.
पुढं चार वर्षानंतर Yahoo ला आपली चूक कळाली. गुगल विकत न घेण्याचा त्यांना पश्चाताप झाला. Yahoo ने पुन्हा एकदा गुगल सोबत डिल करण्यासाठी पुढाकार घेतला. या संदर्भात, दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक महिने वाटाघाटी सुरू होत्या. पण, इथेही करार अंतिम होऊ शकला नाही. याहू गुगलला ३ अब्ज डॉलरला घेण्यास तयार होते पण गुगलकडून ५ अब्ज डॉलरची मागणी केली होती.
तेव्हापासूनच याहूचा वाईट काळ सुरू झाला होता. दुसरीकडे, गुगल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. Gmail सारख्या सेवांमुळेही त्यांची लोकप्रियता वाढली. नोव्हेंबर २००७ मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम सादर करून त्यांनी एका नवीन युगाची सुरुवात केली. या ऑपरेटिंग सिस्टमने मोबाईल फोन चालवण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली.
नावीन्यपूर्णतेच्या बाबतीत याहू गुगलपेक्षा खूप मागे राहिल्याने त्यांचा व्यवसाय घसरत राहिला. एकीकडे ते गुगल विकत घेण्ची चर्चा करत होते. तर दुसरीकडे त्यांची कंपनी तोट्यात गेली होती. २००८ मध्ये, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने याहूला ४४.६ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली. मायक्रोसॉफ्टची ऑफर ही याहूला गुगलशी स्पर्धा करण्याची शेवटची संधी होती. पण, त्यांनी तिही नाकारली. अखेर २०१६ मध्ये अमेरिकेतील व्हेरिझॉन टेलिकम्युनिकेशन्सने याहू विकत घेतले. तो करार ५ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी किमतीत झाला.