WhatsApp चं नवं पाऊल! महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ५०० गावं घेतली दत्तक, काय आहे कंपनीचा प्लान? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:51 PM2021-12-16T12:51:37+5:302021-12-16T12:58:55+5:30

WhatsApp डिजिटल पेमेंटबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याचा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला मोठा फायदा होणार आहे. काय आहे व्हॉट्सअॅपचा नेमका प्लान जाणून घेऊयात...

व्हॉट्सअॅपनं डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील ५०० गावं दत्तक घेण्याचं जाहीर केलं आहे. यात गावागावांमध्ये WhatsApp डिजिटल पेमेंटबाबत जागरुकता निर्माण केली जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना डिजिटल व्यवहारांकडे वळण्यासाठी तयार केलं जाणार आहे.

भारतात व्हॉट्सअॅपचे ५० कोटींहून अधिक युझर्स आहेत. व्हॉट्सअॅपकडून सुरुवातीला एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. यात गावांना दत्तक घेऊन गावात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी काम केलं जाणार आहे. सुरुवातीला ५०० गावांमध्ये याबाबतचं काम केलं जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ५०० गावांमध्ये सुरुवातीला प्रकल्प राबवल्यानंतर त्याचा प्रतिसाद पाहून पुढील दिशा ठरवण्यात येईल. व्हॉट्सअॅपनं यासाठी 'पेमेंट ऑन व्हॉट्सअॅप' ही सेवा सुरू केली आहे. ज्या पद्धतीनं 'गुगल पे'वरुन पेमेंट करता येतं त्याच धर्तीवर आता व्हॉट्सअॅप पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहेत.

'मेटा'नं भारतात एका वार्षिक कार्यक्रमात नव्या प्रकल्पाची घोषणा केली. मेटा कंपनीच्या अॅप्समुळे समाजात आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रावर झालेल्या सकारात्मक परिणामांची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या व्हॉट्सअॅपचं संपूर्ण लक्ष डिजिटल पेमेंट प्रति जागरुकता निर्माण करण्यावर दिलं आहे. सरकारनं देखील रोख व्यवहार कमी होऊन डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल यासाठी पुढाकार घेतला आहे.

व्हॉट्सअॅप पेमेंटच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना जोडण्याचा कंपनीचा मानस आहे. याच मिशनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एकूण ५०० गावांना दत्तक घेतलं जाणार असल्याचं व्हॉट्सअॅपनं सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपचा वापर करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे यूपीआय पेमेंटबाबतही ग्राहकांना व्हॉट्सअॅप पेमेंट करणं जास्त सोपं ठरेल असा दावा व्हॉट्सअॅप कंपनीचे भारतातील प्रमुख अभिजित बोस यांनी केला आहे.

WhatsApp नं या मोहिमेचं नाव डिजिटल पेमेंट उत्सव असं ठेवलं आहे. याअंतर्गत १५ ऑक्टोबर पासूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील क्याथनहल्ली गावातून व्हॉट्सअॅपच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

यूपीआयमध्ये साइन अप, यूपीआय अकाऊंट सेटिंग आणि सेफ्टी टिप्सबाबत गावातील नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात येते. गावकऱ्यांना डिजिटल पेमेंटबाबत साक्षर करुन व्हॉट्सअॅपनं गावात डिजिटल व्यवहारांना चालना दिली आहे. गावातील अनेक नागरिक आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार देखील करू लागले आहेत.

बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार मांड्या जिल्ह्यातील व्हॉट्सअॅप कंपनीनं दत्तक घेतलेल्या गावात आता किराणा दुकानापासून ब्युटी पार्लर आणि इतर लघू व्यवसायांमध्ये व्यवहारामध्ये 'पेमेंट ऑन व्हॉट्सअॅप'चा वापर केला जाऊ लागला आहे.

गावातील एका किराणा दुकानदारानं सांगितलं की गावातील बहुतांश लोक आता दुकानात नव्हे, तर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मालाची लिस्ट पाठवतात आणि लोकेशन शेअर करतात. दुकानदाराकडून संबंधित सामान ग्राहकाला घरपोच केले जाते आणि पैसे देखील व्हॉट्सअॅप पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं दिले जातात.