...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात' By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:10 PM 2020-05-07T12:10:55+5:30 2020-05-07T12:14:04+5:30
क्रिकेटप्रेमी देशात महिला खेळाडूंनी आपला ठसा उमटवल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं दिली.
पण, अजूनही फार कमी प्रमाणात महिला खेळाकडे करिअर म्हणून पाहत आहेत आणि ही स्थिती बदलायला अजून वेळ लागेल, असंही ती म्हणाली.
सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या सानियानं गुरुवारी अखिल भारतीय टेनिस संघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्रात सहभाग घेतला होता. त्यात तिनं हे मत व्यक्त केलं.
सानिया म्हणाली,''क्रिकेटच्या या देशात महिला खेळाडूंनीही वर्चस्व गाजवले याचा मला अभिमान आहे. एका महिलेला खेळात कारकीर्द घडवणे किती अवघड असते, हे मी जाणते.''
''परिस्थिती बदलत असल्याचे हे संकेत आहेत, परंतु अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 15-16 वर्षांची झाल्यानंतर मुली खेळणे सोडून देतात. त्याला भारतीय संस्कृती जबाबदार आहे,'' असेही सानिया म्हणाली.
''भारतातील पालक खेळाकडे करिअर म्हणून पाहत नाही. त्यांना त्यांच्या मुलीनं डॉक्टर, वकील, शिक्षक बनावे असे वाटते. मागील 20-25 वर्षांत परिस्थिती बदलली आहे, परंतु अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे,'' असे ती म्हणाली.
पी. व्ही. सिंधु, सायना नेहवाल, एमसी मेरी कोम, विनेश फोगाट, मीराबाई चानू आदी महिलांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डौलानं तिरंगा फडकावला आहे.
पण, महिला खेळाडूंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. सानियानं सांगितलं की,''मुलींसाठी काही गोष्टी आधीपासूनच ठरवलेल्या आहेत. मी कारकिर्दीत एवढं यश मिळवल्यानंतरी मला विचारलं जात होतं की बाळाचा कधी विचार करणार. ...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही.''
''मी वयाच्या सहाव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला विम्बल्डनमध्ये खेळायचे आहे, असे कोणत्या मुलीनं म्हटलं असतं तर लोकं हसली असती. लोक काय म्हणतील, या वाक्यानं अनेकांच्या स्वप्नांची हत्या केली. मी नशीबवान आहे की माझ्या पालकांनी हा विचार केला नाही,''असे ती म्हणाली.