अभिनेता प्रवीण तरडेंना आवडला 'अंबरनाथ पॅटर्न', सिलेंडर मॅनला चित्रपटात संधीचं आश्वासन By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:50 PM 2021-07-01T12:50:31+5:30 2021-07-01T13:05:07+5:30
दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांनी सागरला आपल्या चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलंय. यासंदर्भात सागरचा फोटो व्हायरल करणाऱ्या तुषार भामरे यांनी माहिती दिली आहे. अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असे या सिलेंडर मॅनचे नाव आहे.
सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचे मोठे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे व्हायरल पोस्टमुळे सागरचं नशिबच पालटलंय.
दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांनी सागरला आपल्या चित्रपटात संधी देण्याचं आश्वासन दिलंय. यासंदर्भात सागरचा फोटो व्हायरल करणाऱ्या तुषार भामरे यांनी माहिती दिली आहे.
३० किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण ४५ किलोचे असून कसं चालेल? हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचे.
याच जिद्दीतून सागरने गेल्या २-३ वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली आहे. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला.
सागर हा अंबरनाथच्या भारत गॅसची एजन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून गेल्या 10 वर्षांपासून तो गॅस सिलेंडर वाहण्याचं काम करत आहे.
सागर अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत फेसबुकवर टाकले.
अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्स पासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या पर्सनॅलिटीचं कौतुक केले.
सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला. १२ वी पर्यंत शिकलेल्या सागरचे बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झाले. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरने अंबरनाथ गाठले.
१२ वी नंतर अंबरनाथला काका काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी १२ वर्षांपासून सागर नोकरी करतोय.
सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून, ४-४ मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन चढून सागर त्याचे घर चालवतो.
पण आयुष्य एका रेषेत चालले असताना अचानक असे काही तरी होईल, आणि आयुष्य रातोरात इतके बदलेल, असं स्वप्नातही वाटले नव्हते, असे सागर नम्रपणे सांगतो.