ठाण्यात मोफत "शो" ला तुफान गर्दी, मनसेकडून आता ३ शो फुकट By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:32 PM 2022-11-08T19:32:03+5:30 2022-11-08T19:41:30+5:30
'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रात्री १० च्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शहरातील विवियाना मॉल येथील शो बंद पडला. 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रात्री १० च्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शहरातील विवियाना मॉल येथील शो बंद पडला.
यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले. तसेच कोण जितेंद्र आव्हाड? असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली.
दरम्यान, आव्हाड यांची पाठ फिरताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ५ मिनिटांत विवियाना मॉल गाठत हर हर महादेव हा चित्रपट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.
सोमवारी रात्री सदर प्रकार घडला त्या ठाण्यातील विवियाना मॉलच्या चित्रपट गृहातच 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या 'मोफत शो'चे आयोजन मनसेकडून करण्यात आले.
त्यानुसार, आज सायंकाळी ६.१५ वाजता मोफत चित्रपट पाहण्यासाठी ठाणेकरांनी विवियाना मॉलजवळ मोठी गर्दी केली होती. एकप्रकारे अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आज पुन्हा ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोफत शो साठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे, एक शो बुक करायला सांगितला होता. पण, वाढत्या गर्दीमुळे आता तिसरी स्क्रीनही बुक करायला सांगितल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
जे काल घडलंय त्याचा विरोध करायला लोकं इथे आले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी महाराजांचा चित्रपट बंद केलेलं लोकांना आवडलेलं नाही. तुम्ही त्या प्रेक्षकाला मारलं का? तुम्हाला अधिकार आहे का? असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला आहे.
ज्या प्रेक्षकाला राष्ट्रवादीच्या समर्थकांनी मारलं त्याचे ठाण्यात ४ मोठे हॉटेल आहेत, त्याचे सासरे मोठे लेखक आहेत. त्याची बायको पीएचडी होल्डर आहे. हे काय सांगतात, एखाद्याला बेवडा बोलून बदनाम करणं सोप्प असतं, असेही जाधव यांनी म्हटलं.
राज ठाकरेंचा आवाज चित्रपटात असल्यामुळेच मनसे हर हर महादेव चित्रपटाला पाठिंबा देत आहे असं नाही. जिथं छत्रपती शिवाजी महाराज येतात, तिथं मनसेचा पाठिंबा असतो, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एका दर्शकाने तिकिटाचे पैसे परत द्या, आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दांत मॉलचालकाला सुनावले. यानंतर या दर्शकाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, या दर्शकाला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.