Travel Facts: रेल्वेत का वाजवला जातो हॉर्न? या हॉर्नचे आहेत तब्बल ११ प्रकार, सर्वात लांब हॉर्न आहे 'अशासाठी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:43 PM2022-03-13T17:43:21+5:302022-03-13T18:18:46+5:30

रेल्वेचा (Indian railway) हॉर्न (Train Horn) अनेकांना आवडतो. जेव्हा ट्रेन थांबते (Train Stops) किंवा रेल्वे स्टेशनमधून पास होते, तेव्हा हॉर्न वाजवला जातो. रेल्वेने प्रवास (traveling) करताना अनेकदा तुम्ही रेल्वेचा हॉर्न ऐकला असेल. परंतु, ट्रेनचा हॉर्न वाजवण्याचे किती प्रकार आहेत? या हॉर्नचा नेमका अर्थ काय, हे फारच कमी जणांना माहिती असेल.

तुम्हाला माहिती आहे का, रेल्वेचे हॉर्न तब्बल ११ वेगवेगळ्या प्रकारे (different ways) वाजवले जातात. या हॉर्नच्या माध्यमातून ट्रेनचा चालक आणि गार्ड यांच्यात संवाद साधला जातो.

सहा वेळा छोटा हॉर्न- जेव्हा ट्रेन काही अडचणीत असते, तेव्हा ड्रायव्हर सलग सहा वेळा छोटा हॉर्न वाजवतो. याद्वारे तो जवळच्या स्टेशनला मदतीचं आवाहन करत असतो.

दोनदा थांबून हॉर्न वाजवणं- जर ड्रायव्हर जरा थांबून लांब हॉर्न देत असेल, तर ट्रेन स्थानकाजवळचं क्रॉसिंग पार करणार आहे, असा त्याचा अर्थ असतो. या हॉर्नमधून लोको पायलट ट्रॅकच्या सभोवताली असणाऱ्या व्यक्तींना ट्रेन येत असल्याची सूचना देतो.

दोन लांब आणि एक लहान हॉर्न- प्रवासादरम्यान असा हॉर्न ऐकला, तर समजून घ्या, की ट्रेन ट्रॅक बदलत आहे.

दोन लांब आणि दोन लहान हॉर्न- दोन लांब आणि दोन लहान हॉर्न वाजवून मोटरमन गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास सूचित करतो.

एक छोटा हॉर्न- जर लोकोपायलट लहान हॉर्न वाजवत असेल, तर याचा अर्थ असा, की ट्रेन धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी यार्डात जाण्यास तयार आहे. यानंतर, ती पुन्हा प्रवाशांसह पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

दोन छोटे हॉर्न- ट्रेन प्रवासासाठी तयार असताना हा हॉर्न वाजवला जातो. या हॉर्नद्वारे लोकोपायलट गार्डना संकेत देतो, की ट्रेन प्रवासासाठी तयार आहे, पुढे जाण्यासाठी सिग्नल द्या.

तीन छोटे हॉर्न- रेल्वेचा लोकोपायलट तीन लहान हॉर्न आणीबाणीच्या स्थितीत वाजवतात. याचा अर्थ असा होतो, की ड्रायव्हरने इंजिनवरचं नियंत्रण गमावलं आहे. म्हणून तो या हॉर्नद्वारे गार्डना संकेत देतो, की त्यांनी व्हॅक्यूम ब्रेक त्वरित खेचला पाहिजे. अशी घटना क्वचितच घडते आणि हा ब्रेकदेखील आपत्कालीन स्थितीतच वापरला जातो.

चार लहान हॉर्न- ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असताना चार लहान हॉर्न वाजवले जातात. चालत असलेली ट्रेन थांबली असेल आणि ड्रायव्हर चार वेळा लहान हॉर्न वाजवत असेल, तर तो गार्डला हा इशारा देत आहे, की इंजिन खराब झाल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नाही.

एक लांब आणि एक छोटा हॉर्न- ट्रेन चालवण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी ब्रेक पाइप सिस्टीम तपासण्यासाठी लोकोपायलट एका लांब आणि एका छोट्या हॉर्नद्वारे गार्डला सूचित करतो. यानंतर गार्ड, ब्रेक नीट काम करत आहे की नाही, हे तपासतात.

दोन लहान आणि एक लांब हॉर्न- या हॉर्नने ड्रायव्हर गार्डला इंजिनवर नियंत्रण ठेवण्यास सूचित करतो. हा हॉर्न तेव्हाच वाजवला जातो, जेव्हा कोणी ट्रेनची इमर्जन्सी साखळी ओढली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला असेल.

बराच वेळ वाजणारा लांब हॉर्न- जर हा हॉर्न कोणत्याही स्टेशनवर ऐकू आला, तर याचा अर्थ असा आहे, की ती ट्रेन त्या स्थानकावर थांबणार नाही. ट्रेन स्थानक नॉनस्टॉप ओलांडणार आहे.