'ही' युक्ती वापरली तर विमान प्रवासही स्वस्तात होऊ शकतो; कुटुंबासोबत जा फिरायला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 10:53 AM2022-12-07T10:53:00+5:302022-12-07T10:56:13+5:30

विमानानं प्रवास करण्याचं फार अप्रूप आता राहिलेलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही काही वेळा विमानानं प्रवास करावा लागतो. एकदा तरी कुटुंबासह विमान प्रवास करायचा, म्हणूनही काही जण विमानानं आपल्या कुटुंबीयांना घेऊन जातात.

अर्थातच रेल्वे आणि बससेवेपेक्षा विमानाचं तिकीट काहीसं जास्त असतं, पण त्यासाठीच्या काही युक्त्या वापरल्या तर विमान प्रवासही बऱ्यापैकी स्वस्तात होऊ शकतो. काही वेळा तर तो रेल्वेच्या एसी तिकिटापेक्षाही स्वस्त होऊ शकतो.

विमान प्रवास करणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते. पण विमान प्रवास महागडा असतो त्यामुळे अनेकजण स्वत:च्या स्वप्नांना आवर घालतात. विमान प्रवासामुळे तुमच्या वेळेची खूप मोठी बचत होते पण त्या प्रवासाचं तिकीट महाग असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा विमान प्रवास स्वस्त होईल. त्यात पहिला आणि सर्वांत सोप्पा नियम म्हणजे आपल्या प्रवासाची तारीख जर नक्की असेल, साधारण महिनाभर आधीच तिकीट बुक करा.

वीकेंडला म्हणजे साधारणपणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी विमानांचं तिकीट सर्वाधिक असतं. तुम्ही सहज म्हणून कुठे जाणार असाल, तर बुधवार वगैरे आठवड्याचा मधला वार प्रवासासाठी निवडा. त्यावेळी तिकीट दर सर्वांत स्वस्त असतात.

याशिवाय रात्री उशिरा, मध्यरात्री, भल्या पहाटे किंवा संध्याकाळची फ्लाइट घेतली तरी तिकिटांचे दर कमी असतात. तुमच्या प्रवासाचा दिवस अगदी काटेकोर न ठेवता लवचीक ठेवला, तर ज्या दिवशी कमी दर आहेत, त्या दिवसाचं तिकीटही तुम्हाला बुक करता येईल.

तिकिटांसाठी अनेक विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काऊंट्स, डील्स, कॅश बॅक देत असतात. त्या त्या एअरलाइन्सच्या वेबसाइट्स, त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही या ऑफर्स पाहायला मिळतात.

तिकिटांसाठी ‘नॉन रिफंडेबल’ हा पर्याय अवश्य निवडा. काही ‘वैध’ कारणांनी तुम्हाला जर प्रवास करता नाही आला, तर काही कंपन्या आपल्या तिकिटाचे पैसे पूर्णपणे किंवा काही प्रमाणात परत करतात. पण हे तिकीट महागही पडतात.

अमुक एका दिवशी आपल्याला प्रवास करायचाच आहे, हे निश्चित असेल, तर ‘नॉन रिफंडेबल’ तिकिटाचा पर्याय बराच स्वस्त पडतो. त्यामुळे तुमचे पैसे परत द्यावे लागणार नाहीत त्यामुळे तिकीटाचा दरही कमी दिला जातो.

ज्या ठिकाणी तुम्ही गेलात, तिथून तुम्हाला विमानानंच परत यायचं असेल, तर ‘राऊंड ट्रिप’ तिकीट बरंच फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही नेहमी विमानानं आणि एकाच कंपनीच्या विमानानं प्रवास करीत असाल, तर ‘फ्रिक्वेन्ट फ्लायर’ योजनेचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.

टॅग्स :विमानairplane