-अमृता कदमतेच तेच समुद्रकिनारे, हिलस्टेशन्स, तिथल्या हॉटेल्समधे आयोजित केले जाणारे घाऊक कँडल लाईट डिनर याचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातही नितांत सुंदर पण काहीशी अपरिचित अशी ठिकाणं आहेत जी तुमच्या रोमॅण्टिक ट्रीपला अविस्मरणीय करून टाकतील.हिमालयाच्या कुशीतलं ‘मशोबरा’शिमल्यापासून अवघ्या अधर््या तासाच्या अंतरावर मशोबरा नावाचा एक छोटा स्वर्गच वसलाय. ओक आणि पाईनच्या घनदाट वृक्षराजीत वसलेला हा परिसर. जोडीदाराच्या हातात हात गुंफून लॉंग वॉक करण्यासाठी एकदम योग्य जागा. सफरचंदांच्या बागांना भेट द्या किंवा दुपारी जंगली स्ट्रॉबेरी हातानं तोडून खाण्याचा आनंद लुटा. ज्यांना सगळं काही विसरु न निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं त्यांच्यासाठी हिमालायच्या कुशीत वसलेलं मशोबरा अवर्णनीय आनंद देणारं आहे. ‘हॅवलॉक बेट’पांढरीशुभ्र वाळू अन निळशार पाणीअंदमानातल्या पोर्ट ब्लेअरपासून अवघ्या 57 किमी अंतरावर वसलेलं हे छोटं बेट आहे. पांढरीशुभ्र वाळू, किनाऱ्याशेजारच्या टुमदार झोपड्या आणि भोवताली निळंशार पाणी.. अशा वातावरणात तुमच्या रोमँटिक भेटीचा माहौल न झाला तरच नवल. जोडीदारासोबत केवळ पाण्यात पाय सोडून गप्पा मारत राहिला तरी वेळ कसा संपतोय हे कळणार नाही. शिवाय अधिक वेगळं काही करायचं असेल तर स्कुबा डायव्हिंगचाही पर्याय आहेच.‘खज्जियार’ भारताचं स्वित्झर्लंडहिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात वसलेलं खज्जियार म्हणजे या पर्वतरांगांमधलं एक रत्नच आहे जणू. एका छोट्या पठारावर वसलेल्या या हिल स्टेशनला लागूनच एक तलावही आहे. या तलावाच्या भोवती फिरत फिरत हिमालयातली नवी शिखरं पाहण्याचा आनंद लुटा. इथल्या जंगलातल्या एका सफरीनंही तुमचं मन प्रफुल्लित होईल. उगीच नाही खज्जियारला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं.कोणत्याही ॠतुत पावासाळ्याचा फील देणारं ‘चेरापुंजी’भूगोलाच्या पुस्तकात सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असतंच. पण इथल्या निसर्गसौंदर्याबद्दल फारसं माहिती नसतं. हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी वर्षातल्या कुठल्याही वेळेला तुम्ही पावसाळी वातावरण अनुभवू शकता. सोबत वाफाळलेल्या चहाचा कप आणि तितकीच उबदार स्पर्शाची साथ. शिवाय जेव्हा इथला पाऊस थांबतो तेव्हा इथल्या मातीचा वास वेड लावतो. निवांत जागेचं ‘मरारीकुलम’भारताच्या अगदी दक्षिण टोकाला केरळमध्ये हे किनारी गाव वसलेलं आहे. भारतातला सर्वांत स्वच्छ किनारा म्हणून या गावाची ख्याती आहेच. पण हे स्थळ इतकं निवांत आहे की ते फारसं कुणाला माहितही नाही. त्यामुळेच इतर किनाऱ्यांसारखी या किनाऱ्यावर तुम्हाला एकावेळी फार गर्दी कधी दिसतच नाही. प्रेमाच्या आठवणींसह किनाऱ्यावर पावलांचे ठसे उमटवत गप्पा करायला, सूर्यास्ताकडे पाहत नव्या स्वप्नांत रमायला किंवा कधी हातात नारळपाणी घेऊन निवांत सगळा किनारा धुंडाळून काढायला याच्यासारखं दुसरं ठिकाण नाही.तुम्ही जर हनीमूनला जायचा किंवा तुमच्या लग्नाचा, जोडीदाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेरगावी जायचा प्लॅन करत असाल तर या रोमॅण्टिक फील देणाऱ्या जागांचा अवश्य विचार करा.