Travel: लक्षद्वीपइतकीच सुंदर आहेत भारतातील 'ही' दहा हनिमून डेस्टिनेशन्स! By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:06 PM 2024-01-08T14:06:55+5:30 2024-01-08T14:13:44+5:30
Travel Tips: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जावे म्हणून नुकतेच केलेले फोटोशूट सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांनीदेखील री ओढत लक्षद्वीपला गेलंच पाहिजे म्हणत धडाधड पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे का होईना, समस्त भारतीयांना 'तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी' हे नक्कीच उमगले असेल. त्यामुळे सहल असो नाहीतर हनिमून यासाठी रम्य ठिकाणांच्या शोधात असताना भारतातील सर्वोत्तम ठिकाणांचा विचार करता येऊ शकेल हे सर्वांच्याच लक्षात आले असेल. हनिमून अर्थात मधुचंद्र! लग्नानंतर प्रत्येक जोडप्याच्या खास आणि खाजगी क्षणांसाठी राखीव ठेवलेला हा काळ निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी महागडी ठिकाणं निवडायला हवीत असे नाही. पूर्वी 'लोणावळा, खंडाळा, पन्हाळा' यात हनिमून उरकले जायचे. मात्र आता दोघेही कमावते असल्याने आणखी चांगल्या पर्यायांचा विचार केला जातो. अशात तुम्ही देखील हनिमून किंवा कौटुंबिक तसेच मित्र मैत्रिणींबरोबर सहल किंवा सोलो ट्रिप प्लॅन करत असाल तर पुढील यादीवरून एकदा नजर टाकाच!
अंदमान निकोबार : निसर्गसौंदर्याने नटलेलं हे बेट भूलोकीचा स्वर्गच! विशेषतः हनिमूनसाठी या स्थानकाला अधिक पसंती मिळते. तिथले बीच रिसॉर्ट, स्कुबा डायव्हिंग या आकर्षणांमुळे सहलीचा आनंद द्विगुणित करता येतो. तिथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते जूनचा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. अंदमान निकोबार : निसर्गसौंदर्याने नटलेलं हे बेट भूलोकीचा स्वर्गच! विशेषतः हनिमूनसाठी या स्थानकाला अधिक पसंती मिळते. तिथले बीच रिसॉर्ट, स्कुबा डायव्हिंग या आकर्षणांमुळे सहलीचा आनंद द्विगुणित करता येतो. तिथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते जूनचा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. अंदमान निकोबार : निसर्गसौंदर्याने नटलेलं हे बेट भूलोकीचा स्वर्गच! विशेषतः हनिमूनसाठी या स्थानकाला अधिक पसंती मिळते. तिथले बीच रिसॉर्ट, स्कुबा डायव्हिंग या आकर्षणांमुळे सहलीचा आनंद द्विगुणित करता येतो. तिथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते जूनचा कालावधी सर्वोत्तम मानला जातो.
मनाली : हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश येथे स्थित आहे. ऑक्टोबर ते जून चा कालावधी तिथे जाण्यासाठी अतिशय योग्य आहे. तिथले निसर्ग सौंदर्य स्वित्झर्लंडलाही मागे टाकेल असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बर्फाच्छादित पर्वत रांगा बघत गुलाबी थंडी अनुभवण्याची मजाच वेगळी!
लेह-लडाख : विशेषतः ट्रेकर्सची पहिली पसंती असलेले लेह लडाख जून ते सप्टेंबरमध्ये पाहण्यासारखे असते. नवदाम्पत्यांना देखील तिथे हनिमूनला जाण्याचा प्लॅन करता येईल. अथांग आकाश आणि नितळ निळे पाणी, डोंगर रांगा आणि सभोवतालचा शांत परिसर हनीमूनचा काळ संस्मरणीय बनवेल.
कूर्ग : ऑक्टोबर ते मार्च या काळात कूर्गचे सौंदर्य बहरते. तेथील ग्रीनरी पाहून डोळे सुखावतात. तनामनाला तजेला मिळतो. तिथले धबधबे, जंगल, हत्ती सवारी आणि ऍडव्हेंचरसाठी राखीव असलेली ठिकाणं एन्जॉय करताना नवरा बायकोचे बॉण्डिंग घट्ट करण्यास नक्कीच मदत करतील.
शिमला : चार-पाच दिवसांची सहल ठरवत असाल तर ऑक्टोबर ते जूनमध्ये शिमला-मनाली प्लॅन करा. इतर कोणत्याही हिल स्टेशनच्या तुलनेत पर्यटकांची पसंती शिमल्याला जास्त आहे. तिथल्या गारठ्यात कुल्लडवाली चाय आणि पारंपरिक जेवणाची लज्जत पर्यटनाचा आनंद वाढवते.
मुन्नार : सप्टेंबर ते मे या कालावधीत चहाच्या बागांमध्ये फेरफटका मारत केरळचं सौंदर्य बघायचे असेल तर मुन्नार हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. निवांत क्षण घालवावे, निसर्गाचा आनंद घ्यावा, धबधबे बघत जंगल सफारी करावी आणि तिथल्या चहाचा घोट घेत हनिमून साजरा करावा, याहून उत्तम काय असेल?
उदयपूर : राजस्थानचे हे ठिकाण म्हणजे 'तलावांचे शहर' म्हणून ओळखले जाते. तिथे सगळाच रॉयल कारभार, तरीही खिशाला परडवेल अशी अनेक ठिकाणं पाहता कपल्स हनिमूनसाठी तिथे जाणे पसंत करतात. शिवाय तऱ्हेतऱ्हेच्या शोभिवंत वस्तू, कपडे, क्रोकरी यांची खरेदी मात्र न थांबणारी आहे.
कोकण : मराठी माणसाचं हृदय आणि आयुष्यात एकदा तरी अनुभवावं असं ठिकाण! कोकणचे किनारे मराठी मनालाच नाही तर अमराठी लोकांनाही भुरळ घालतात. शिवाय अलीकडे कोकणपट्टीत पर्यटन व्यवसाय वाढल्यामुळे देवदर्शन आणि हनिमून असे कम्बाइन पॅकेज प्लॅन करता येते.
डलहौसी : मिनी स्वित्झर्लंड असा उल्लेख करावा ते म्हणजे हिमाचल प्रदेश स्थित डलहौसी हे शहर. इथे तुम्ही वर्षभरात कधीही जाऊन तिथला आनंद लुटू शकता. नाव इंग्रजाळलेलं वाटत असलं तरी भारतीय संस्कृतीची छाप शहरावर दिसून येते. बोटिंग, हायकिंग, ट्रेकिंग हे तिथले मुख्य आकर्षण आहे.
दार्जिलिंग : पश्चिम बंगाल स्थित दार्जिलिंग हे चहा उत्पादनासाठी ओळखले जात असले, तरी तेथील निसर्ग सौंदर्य नेत्रदीपक आहे. फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबर तिथे जाण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. तेथील बगीचे पाहून दिल गार्डन गार्डन झालं नाही तरच नवल!
याशिवाय नैनिताल, उटी, श्रीनगर, मसुरी, जयपूर, शिलॉंग, माउंट अबू, पॉंडिचेरी, चेरापुंजी, दीव-दमण, महाबळेश्वर, माथेरान, रानीखेत, कोडाईकॅनल, ओरिसा अशी शेकडो ठिकाणं आहेत, जी बघता बघता आपली हयात जाईल, पण भारत संपणार नाही. एवढा तो संपन्न आहे. त्यामुळे नवीन नात्याची सुरुवात आपल्या मातृभूमीच्या दर्शनाने करणे केव्हाही चांगलेच नाही का? आणि हे प्लॅन ठरले नाही, तर आपलं गोवा आहेच की राव!