गोव्याच्या किनाऱ्यावर जेलीफिशचा कहर; २ दिवसात ९० लोकांना दंश, वाचा जेलीफिशबद्दल माहित नसलेल्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 04:57 PM 2020-11-25T16:57:05+5:30 2020-11-25T17:51:37+5:30
गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बागा कॅलंग्यूट बीचवर ५५ पेक्षा जास्त लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. कँडोलिम बीचवर या विषारी माश्याने १० लोकांना दंश केला आहे. दक्षिण गोव्यात २५ पेक्षा जास्तवेळा अशा घटना घडल्या आहेत. विषारी जेलीफिशने दंश केल्यानंतर लोकांना प्राथमिक उपचारांची आवश्यकता असते. जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला वेदना होतात तसंच शरीराच्या ज्या भागावर जेली फिशने दंश केला आहे तो भाग सुन्न होतो. याव्यतिरिक्त या माश्याच्या संपर्कात आल्याने काहीवेळासाठी त्वचेवर संवेदना जाणवत नाहीत.
जेलीफिश सगळ्यात जीवघेण्या समुद्री जीवांपैकी एक आहे. यातील एक प्रजात खूप घातक आहे. या प्रजातीचे जेलीफिश ऑस्ट्रेलिया आणि इंडो पॅसिफिक समुद्रात मिळतात. हा मासा चौकोनी डब्ब्याप्रमाणे दिसतो. या माश्याला बॉक्स जेलिफिश असंही म्हणतात. या माश्यांचे टेंटिक्स म्हणजेच सोंड खूप विषारी असते. यामुळे एखाद्या वयस्कर व्यक्तीला काही मिनिटात धोका पोहोचू शकतो किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
जेलीफिशच्या शरीरात ९५ टक्के पाणी असते. प्रोटीन्स मासपेशी शरीराच्या पाच टक्के भागात असतात तुलनेने माणसांच्या शरीरात ६० टक्के पाणी असते. जेलीफिशच्या समुहाला तीन नावं आहेत. जेलीफिशच्या समुहाला ब्लूम, स्मॅक आणि स्वार्म असं म्हणतात. असं मानलं जातं की जेलीफिशने दंश केल्यानंतर त्या त्वचेवर गरम पाणी टाकल्यानंतर बरं वाटतं. पण दंश केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास होत असेल तर लगेचच रुग्णालयात दाखल करायला हवं.
जेलीफिशला मासा म्हणत असले तरी हा मासा नाही. माश्यांच्या शरीरात हाडं असतात आणि पाण्यात राहत असल्यामुळे मासे गिल्सचा वापर करतात. जेलीफिशला हाडं नसतात. जेलीफिश आपले मेंब्रेन आणि त्वचेच्या माध्यमातून ऑक्सिजन घेतात.
१९९१ मध्ये २००० पेक्षा जास्त जेलीफिश अंतराळात पाठवण्यात आले होते. कारण त्यांच्यावर आंतराळात कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जाऊ शकेल. त्यावेळी २००० जेलीफिशने अंतराळात ६० हजारांपेक्षा जास्त जेलीफिशना जन्म दिला. जेव्हा त्यांना पृथ्वीवर आणण्यात आले तेव्हा अंतराळात जन्माला आलेले जेलीफिश पृथ्वीवर व्यवस्थित जगू शकत नव्हते.
जगभरात जेलीफिशच्या एकूण २५ प्रजाती आहेत. ज्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. नुडल्समध्येही अनेक देशात जेलीफिशचा वापर केला जातो. जेलीफिशचे पदार्थ तयार करत असताना मीठाची गरज भासत नाही. कारण जेलीफीशमुळे एक वेगळी चव पदार्थांना येते.
जगभरातील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जेलीफिशची एक प्रजात कधीही मरत नाही. या प्रजातीचे नाव टूरिटोपसिस डॉर्नी (Turritopsis dohrnii) आहे. या प्रजातीचे जेलीफिश वयस्कर असतात. त्यामुळे समुद्राच्या तळाला चिकटतात.त्यानंतर हे जेलीफिश जेनेटिकली स्वतःला जीवंत करतात.
काही जेलीफिश हे बायो-ल्यूमिनिसेंट असतात. हे जेलीफिश प्रत्येक समुद्रात मिळतात. समुद्रतील लहान झाडं, छोटे मासे खाऊन हे मासे पोट भरतात. छोटे मासे खाण्यासाठी आधी जेलीफिश या माश्यांना दंश करतात. मासे बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना खातात.