उत्तरेला खिडक्या असतील तर पडदे लावू नका, कारण...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 22, 2021 03:31 PM2021-01-22T15:31:25+5:302021-01-22T15:47:59+5:30

खिडकीला आपली थिंकिंग पार्टनर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकांतात किंवा एकटेपणात खिडकीजवळ उभे राहून आजवर कितीतरी वेळ आपण चिंतनात घालवला असेल. ऊन, वारा, थंडीत खिडकीची दारे लोटलेली असली, तरी पावसाळ्यात याच खिडकीजवळ उभे राहून आपण बाहेरचा नजारा न्याहाळला असेल. चहाचे घोट आणि भज्यांचा फडशा पाडला असेल. अशी ही जीवाभावाची खिडकी आर्थिकदृष्ट्या लाभ करून देणारीदेखील आहे, असे आपल्याला कोणी सांगितले तर? याबाबत वास्तुशास्त्रज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊया.

घराला प्रशस्त खिडकी आणि भरपूर सूर्यप्रकाश असेल, तर घर प्रकाशाने न्हाऊन निघते. अशा घरांना सजावटीचीही फारशी गरज नसते. कारण, सूर्यकिरणांनी ती कसर आपोआप भरून निघते.

अलीकडच्या नवीन बांधकामात सरसकटपणे घरांना फ्रेंच विंडो दिलेली असते. त्याला जोडून अनेक जण बसण्यासाठी एखादा संगमरवरी कट्टा बनवून घेतात किंवा छोटा बेड, सोफासेट खिडकीलगत ठेवतात. आकर्षक पडद्यांमुळे खिडकीची भव्यता आणखी जाणवते. तसेच खिडकीचे सौंदर्यही वाढते.

मात्र, तुमच्या घराची खिडकी उत्तर दिशेला असेल, तर तुम्ही पडद्यांचा मोह टाळायला हवा. याबाबत वास्तुतज्ज्ञ पंडित रमेश पलंगे मार्गदर्शन करतात, 'उत्तरेतील खिडक्या आकाराने मोठ्या, प्रशस्त असल्यास सकाळच्या अल्ट्रा व्हायलेट सूर्यकिरणांचा, डी जीवनसत्वांचा वास्तूमध्ये प्रवेश होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. सूर्यकिरणांमुळे वास्तूत प्रसन्नता राहते.

वास्तू पदमंडळानुसार उत्तर दिशेच्या मध्यावर कुबेर देवतेचे स्थान असल्यामुळे वास्तुशास्त्रदृष्ट्या उत्तरेच्या मध्यावर प्रवेशद्वार अथवा खिडकी असल्यास आर्थिकदृष्ट्या वास्तुधारकास फायदा मिळू शकतो. उत्तरेच्या खिडक्यांना पडदे नसावेत.