पिंपरी : सराईत आरोपीकडून घरफोडीच्या १० गुन्ह्यांची उकल करून सात लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनकडून ही कारवाई करण्यात आली. सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे (वय ५०, रा. गांधीनगर, देहुरोड), असे सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चाकण, आळंदी, दिघी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची माहिती मिळाली. आरोपी हा म्हाळुंगे चौकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये एक महिन्यापासून येरवडा कारागृहात असल्याबाबत माहिती मिळाली. न्यायालयाच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
इतर काही घरफोडीचे गुन्हे चाकण, दिघी आणि आळंदी भागात केल्याचेही त्याने सांगितले. आरोपीकडून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस आणून सात लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून आरोपी घरफोडी करीत होता. त्याच्यावर यापूर्वीचे घरफोडीचे १८ गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, रामदास इंगवले, उपनिरीक्षक विजय जगदाळे, गिरीश चामले, यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, रूषीकेश भोसुरे, अनिल लांडे, महेश भालचिम, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधीर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.