पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांच्या समवेत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारपासून एक वेळ पाणीपुरवठा आणि दहा टक्के पाणीकपात केली जाणार असून, नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. डिसेंबर उजाडला, तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने, पावसाने ओढ दिल्याने, पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली होती. तसेच शहरात होणाऱ्या पाण्याच्या असमान वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही भागात २४ तास, काही भागात एक वेळ, काही भागात दोन वेळ पाणीपुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे पाणीकपात होणार, याबाबतचे संकेत आयुक्तांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक बोलावली होती. ‘लोकमत’ने मंगळवारच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होणार, याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती अतुल शितोळे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, भाजपाच्या गटनेत्या वर्षा मडेगिरी, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, शहर अभियंता महावीर कांबळे, अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, स्थायी समितीच्या माजी सभापती, नगरसेविका शमीम पठाण आदी उपस्थित होते. बैठकीत पाण्याविषयी नियोजन करण्यात आले. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘यापुढील काळात शहरातील सर्वच भागांत एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. एक वेळ पाणी आणि पाणीकपात होत असली, तरी पाण्याचा दाब कमी होणार नाही. ज्या ठिकाणी अडीच ते तीन तास पाणीपुरवठा होणार होता, तिथे २० मिनिटे पाणी कमी येणार आहे. जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवड शहरास पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात केली आहे. शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणात सध्या ६६ टक्के साठा आहे. दररोज आपणास ४५० दलघमी पाणीपुरवठा होतो. त्यात कपात करून ४०५ दलघमी पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ही कपात जुलै २०१६पर्यंत कायम राहणार आहे.’’आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘पाणीकपातीच्या कालखंडात नवीन नळजोड देण्यात येणार नाहीत. तसेच पाणीपुवठा करणाऱ्या टँकरवरही लक्ष असणार आहे. पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी २४ तास उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांच्या दीर्घ मुदतीच्या रजा रद्द केल्या आहेत.’’पाण्यासाठी उपाययोजना सुरूशहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्येचा विचार करून तीन पाणी योजनांचे नियोजन महापालिकेने केले आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले, ‘‘अमृत योजनेत यातील काही योजनांना गती मिळेल. या योजना मार्गी लागल्यास पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही.’’(प्रतिनिधी) पाणीकपात कालावधीत बांधकाम व्यावसायिकांनी पिण्याचे पाणी वापरू नये, यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच जे अधिकारी तक्रारी आल्यानंतर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनीही पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई केली जाणार आहे. पाणीकपातीच्या कालखंडात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपुन करावा. पाणीपुरवठ्यात अडचण येणार नाही याची दक्षता महापालिका घेणार आहे. पाणीपुरवठा विभाग नागरिकांना सेवा देण्यासाठी दक्ष असणार आहे. टँकर पुरवठा करणाऱ्यांना लॉग बुक देण्यात येणार असून, कोणता टँकर कोठे जातो, यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना अभियंत्यांना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही काटकसरीने पाणी वापरावे. - राजीव जाधव, आयुक्त
शहरात उद्यापासून १० टक्के पाणीकपात
By admin | Published: December 09, 2015 12:18 AM