तळवडे : लोणावळा ते पुणे लोकल प्रवासादरम्यान सापडलेली बॅग, दहा हजार रोख रक्कम आणि लॅपटॉप परत करून आजच्या युगात दुर्मिळ होत असलेला प्रामाणिकपणा जपणारी माणसे असल्याचे सिद्ध केले. या व्यक्तीचे नाव राजू रघुनाथ बाठे आहे.तळवडे येथे राहणारे व नोकरीनिमित्ताने दररोज आकुर्डी ते लोणावळा दरम्यान प्रवास करणारे बाठे हे नेहमीप्रमाणे आकुर्डी स्थानकावर आपली बॅग घेऊन उतरले. पण घरी आल्यानंतर आपण घेऊन आलेली बॅग स्वत:ची नसून, दुसऱ्याची कोणाची असल्याचे लक्षात आले. बॅगेत रोख रक्कम दहा हजार, एक स्क्रीन टच लॅपटॉप, तसेच कागदपत्रे होती. कागदपत्रांवर मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर सदर व्यक्तीला संपर्क साधला. ती बॅग दिनकर हर्णे यांची होती. हर्णे यांनी बाठे यांचे आभार मानले. बॅग गायब झाल्याचे दररोज पुणे स्टेशन ते लोणावळा लोकलने प्रवास करणारे हर्णे यांच्या लक्षात येताच त्यांनी पिंपरी रेल्वे स्थानकावर तक्रार नोंदविण्याची विनंती केली. दोघांच्या एकसारख्या असलेल्या बॅग शेजारीशेजारी ठेवल्या असल्यामुळे असा प्रकार घडला. (वार्ताहर)
परत केले १० हजार रुपये आणि लॅपटॉप
By admin | Published: March 28, 2016 3:18 AM