पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराला मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाने पालिकेला मंजूर पाणी कोट्यासाठीचे दर वाढवले आहेत. हे दर दुप्पट केल्याने महापालिका प्रशासनाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे महापालिकेला तब्बल २६ कोटी रूपये शासनाला जादा द्यावे लागणार आहेत. तर तिन्ही धरणांमधून पाणी उचलण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे १०० कोटी रूपये पाण्यासाठी शासनाकडे भरावे लागतील.
शहराला पवना धरणामधून ५१० व एमआयडीसीकडून ३० असे ५४० एमएलडी पाणीपुरवठा शहरामध्ये केला जातो. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात पोहोचल्याने हे पाणी पुरत नाही. त्यामुळे गेल्या सव्वातीन वर्षांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या तक्रारी येत असतात. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामध्येच आता जलसंपदा विभागाने पाण्याचे दर वाढवल्याने पालिकेच्या तिजोरीवर आणखी ताण वाढला आहे.
महापालिकेकडून जलसंपदा विभाग एक हजार लिटरसाठी ५५ पैसे असा दर घेत होते. दररोज ५१० एमएलडी पाण्यासाठी वर्षाचे बिल २६ कोटी इतके आहे. मात्र, जलसंपदा विभागाने हे दर दुप्पटीने वाढविले आहेत. एक हजार लिटरसाठी एक रूपया दहा पैसे असा नवा दर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेस वर्षांसाठी ५२ कोटींचे बिल द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेवर दुप्पटीने आर्थिक भार वाढला आहे.
तसेच, पालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा सुमारे १०० एमएलडी अधिकचे पाणी उचलले जात आहे. तो दर एक हजार लिटरला दाेन रूपये २० पैसे इतका करण्यात आला आहे. दंडाची रक्कम धरून पालिकेस वर्षांसाठी ७४ कोटींचे बिल जलसंपदा विभागास द्यावे लागणार आहे.
आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात २६७ एमएलडी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका पाच वर्षांत पुनर्स्थापना खर्च म्हणून २७९ कोटी रूपये महापालिका जलसंपदा विभागास अदा करणार आहे. पाणी उचलण्यास सुरुवात केल्यानंतर पालिकेस एक हजार लिटरसाठी एक रूपया दहा पैसे दराने बिल भरावे लागणार आहे. पवना, आंद्रा व भामा आसखेड या तीन धरणातील पाण्यासाठी पालिकेस दरवर्षी सुमारे १०० कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत.
आकडेवारीवर एक नजर
पूर्वीचा दर - ५५ पैसे (एक हजार लिटरसाठी)
नवीन दर - एक रुपया दहा पैसे (एक हजार लिटरसाठी)
पवना धरण - ५१० एमएलडी
आंद्रा धरण - १०० एमएलडी
भामा आसखेड धरण - २६७ एमएलडी
पाणीपट्टीतही वाढ होण्याची शक्यता
पाणी घेण्यासाठी व त्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. मात्र, त्या तुलनेमध्ये नागरिकांकडून पाणीपट्टी अत्यल्प घेतली जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात हा खर्च भरून काढण्यासाठी पालिका पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाने पाण्याचे दर वाढवले आहेत. त्यामुळे आता पवना धरणातील पाण्यासाठी वर्षाला ५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. आंद्रा आणि भामा आसखेड धरणामधील पाणी सुरू झाल्यास त्याचेही पैसे जलसंपदा विभागाकडे भरावे लागतील. सर्व मिळून वार्षिक १०० कोटींपर्यंत खर्च जाणार आहे.
- अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.