पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणारा स्मार्ट सिटी प्रकल्प हा विभागनिहाय विकास आणि पॅन सिटी सोल्युशन्स या दोन घटकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत १ हजार १४९ कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. मात्र, या कंपनीला केवळ ५० कोटी खर्चापर्यंतचे प्रकल्प राबविण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला असून, देशातील १०० शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश केला आहे. त्यात पिंपरी- चिंचवड शहराचीही ३० डिसेंबर २०१६ ला निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीनंतर महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला. प्रकल्पामध्ये शहरातील नागरिकांची मते, अभिप्राय, सूचना जाणून घेऊन त्यातील योग्य त्या सूचनांचा प्रकल्प आराखड्यात समावेश केला आहे. ३१ मार्च २०१७ रोजी हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका निवडणुकीमुळे मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याच्या अतिरिक्त सचिवांना अहवाल सादर झाल्याबाबत कळविले.स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्याकरिता चार मुख्य पर्याय सुचविले आहेत. त्यानुसार, रेट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट आणि ग्रीन फिल्ड या तीनही पयार्यांचा प्राधान्याने वापर करून आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात विभागनिहाय विकास आणि पॅन सिटी सोल्युशन्स या दोन घटकांचा समावेश आहे. त्याअंतर्गत १ हजार १४९ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. पिंपळे-गुरव आणि पिंपळे-सौदागर या दोन क्षेत्रांची निवड केली आहे. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीतून होणार हजार कोटींचे प्रकल्प
By admin | Published: April 25, 2017 4:14 AM