ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 10 - घरकुल चिखली येथील कार्यकर्ता सुहास बाबुराव हळदणकर (वय ३२, रा. ) याचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खराळवाडी परिसरात तेथेच राहाणा-या आरोपींनी खून केला. निवडणुकीतील वाद तसेच वैयक्तिक व्देषातून त्यांच्यात भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात सुहासचा डोक्यात दगड मारून खून झाला. त्यामुळे रात्री या परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून प्रकरणात प्रमुख आरोपी काळ्या उर्फ संदीप कलापुरे (वय ३०),प्रतुल घाडगे (वय ३६),अभिजीत कलापुरे (वय २८), माजी नगरसेवक सद्गुरू कदम (वय ४५),दत्ता उर्फ फेट्या कलापुरे(वय २५),संतोष उर्फ मुंड्या आरबेकर (वय ४०),प्रविण कदम उर्फ झिंगºया (वय २८),खंड्या उर्फ प्रविण सावंत (वय २६),गणेश जाधव (वय २५),छोटण पठाण (वय २८),संतोष उर्फ बाब्या कदम (वय २८),सतिश कदम (वय ३१) सर्व राहाणार खराळवाडी अशी आरोपींची नावे आहेत. या मध्ये काही आरोपी हे माजी नगरसेवकाचे जवळचे नातेवाईक आहेत. गणेश जाधव वगळता सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषीकेश बाळासाहेब काटे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमान चौक खराळवाडी येथे रात्री दहाच्या सुमारास काही कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. सुहास हळदणकर याच्यामुळे काळ्या उर्फ संदीप कलापुरे याची नोकरी गेली. तसेच त्याने सद्गुरू कदम यांचे बंधू माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या विरोधातही फलेक्सबाजी केल्याचा मुद्दा हाणामारीसाठी कळीचा मुद्दा बनला.