पिंपरी : फ्लॅट नावावर करून देतो, असे सांगत बँकेकडून कर्जाची रक्कम स्वीकारून २० वर्षानंतरही फ्लॅटचा ताबा दिला नाही. यात ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख रुपयांची फसवणूक केली. चिंचवडगाव येथे २००२ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
अतुल किसनराव गिरमे (६०, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २५) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. वसंत धोंडीबा गावडे (५७, रा. गावडे पार्क, चिंचवड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत गावडे याने चिंचवडगाव येथील केशवनगर येथे २००२ मध्ये फिर्यादी गिरमे यांना दोन फ्लॅट नावावर करून देतो, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी गिरमे यांनी २००२ मध्ये दोन फ्लॅटची किंमत मिळून असे १० लाख ८० हजार रुपये बँकेकडून कर्ज करून दिले. मात्र गावडे याने अद्यापही दोन्ही फ्लॅटचा ताबा फिर्यादी गिरमे यांना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच एका फ्लॅटचे खोटे व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी गिरमे यांना तो फ्लॅट विक्री करून त्यांची फसवणूक केली.