पिंपरी : ‘पीएचडी’धारक घटस्फोटीत महिला समुपदेशकाशी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून बनावट नावाने संपर्क केला. अमेरिकेत डॉक्टर असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी महिलेची १२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी परदेशी टोळीतील एका कांगो महिलेस वाकड पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली.
समुपदेशक महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बियू न्यामाम्बेलो ऑक्ट्वी (वय २८, सध्या रा. बंगळूर, मूळ रा. कांगो) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तसेच याप्रकरणी आणखी एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ‘पीएचडी’धारक असून लहान मुलांसाठी समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. मॅट्रिमोनियल डेटिंग ॲपवरून माहिती घेऊन आरोपीने डॉ. अर्जुन नावाने फिर्यादी महिलेशी संपर्क केला. ‘युएसए’मध्ये कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर असल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीशी लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याची आई आजारी असून, उपचारासाठी बंगळूर येथील बियांचे औषधे पाठविण्यासाठी तसेच या औषधी बियांच्या व्यवसायाकरीता आणि बनावट बिया विकत घेण्यास आरोपीने फिर्यादीला भाग पाडले. त्या बिया विकत घेण्यासाठी ‘यूएस’मधील कंपनीच्या परचेस मॅनेजरसह भारतात येत असल्याचे आरोपीने सांगितले. पासपोर्टवर ग्रिन कार्ड नसल्याने भारतात एअरपोर्टवर पकडले असून, त्याच्याकडील डाॅलर कस्टम अधिकारी यांनी पकडले आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. तेथून सोडवून घेण्यासाठी तसेच आजारी असल्याचे सांगून अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीने फिर्यादीला १२ लाख २९ हजार ४०० रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली.
दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक माहिती घेऊन आरोपी हे बंगळूर येथून गुन्हा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी जानेवारी २०२२ मध्ये बंगळूर येथे जाऊन तपास करून आरोपी निष्पन्न केले होते. त्यावेळी आरोपी महिला तेथून महिन्यापूर्वीच परदेशात निघून गेली असल्याची व तिच्याबरोबर राहणारा तिचा साथीदार तेथेच राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी रात्रीचा ट्रॅप लावला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आरोपी महिलेच्या पासपोर्टवरून तिची ‘एलओसी’ केली होती. त्याप्रमाणे आरोपी महिलेला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले होते. त्यानंतर आरोपी महिलेला वाकड पोलिसांनी १९ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्ली येथून अटक केली.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक एस. एम. पाटील, संभाजी जाधव, पोलीस कर्मचारी दीपक भोसले, भास्कर भारती, शाम बाबा, विक्रम कुदळ, वंदु गिरी, कल्पेश पाटील, शुभांगी मेथे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
‘मॅट्रिमोनियल’बाबत सतर्क रहावे
‘मॅट्रिमोनियल’ वेबसाईट किंवा डेटिंग ॲपवर नाव नोंदणी केल्यानंतर महिला किंवा तरुणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आरोपी घटस्फोटीत किंवा जास्त गरजवंत महिलांची निवड करून त्यांच्याशी डेटिंग ॲपव्दारे ओळख वाढवून आमिष दाखवितात. महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना भावनिक साद घालून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे ‘मॅट्रिमोनियल’ वेबसाइट किंवा डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या व्यक्तिच्या कॉल, मेल आदीची माहिती घ्यावी. तसेच त्याबाबत पूर्णपणे खात्री करावी. तसेच अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यापूर्वी कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तींना माहिती द्यावी. संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.