पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनियरला स्काईपवर अकाउंट उघडण्यास सांगितले. त्यानंतर तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रींग सुरू असल्याचे सांगत बँक खात्यातून १२ लाख रुपये वळते करून घेत फसवणूक केली. रहाटणी येथे २१ आणि २२ एप्रिल रोजी ही घटना घडली.
साॅफ्टवेअर इंजिनिअरने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीस फोन करून त्यांना स्काईप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर आयडी बनवण्यास सांगून त्यांना स्काईपवर जॉईन करून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर लखनऊ येथे मनी लॉन्ड्रींग सुरू असल्याचा बहाणा केला.
त्यानंतर त्यांच्याकडून आधार कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग याबाबतची गोपनीय माहिती घेतली. राष्ट्रीय गोपनीयता कायद्यानुसार फिर्यादीस हा प्रकार कोणालाही सांगता येणार नाही, असे अज्ञात व्यक्तींनी सांगितले. दरम्यान, त्यांनी फिर्यादीच्या खात्यातून १२ लाख रुपये वळते करून घेत त्यांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.