पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच एक वर्षाच्या मुलासह त्याची आई जखमी झाली. दापोडी मेट्रो स्टेशन पुढील बीआरटी बसथांब्यासमोरील रस्त्यावर गुरुवारी (दि. ३० जानेवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
दापोडी येथील ४० वर्षीय महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३१ जानेवारी) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. असीम शमीनखान (२६, रा. रामटेकडी, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची १२ वर्षीय मुलगी, फिर्यादीची २५ वर्षीय मामी व तिचा एक वर्षीय लहान मुलगा रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी संशयित असीम याने त्याचे वाहन भरधाव चालवून त्यांना धडक दिली. यात फिर्यादी यांची १२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी यांची मामी आणि तिचा एक वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिस उपनिरीक्षक राजू भास्कर तपास करीत आहेत.