पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आणण्यासाठी चिखलीत जलशुद्धिकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, या दौऱ्यात जलशुद्धिकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत रोहित्राचा अडथळा ठरत आहे. ते रोहित्र हटविण्यासाठी तब्बल १ कोटी ५२ लाख रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी दीड कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पिंपरी-चिंचवडसाठी मिळणार आहे. त्यापैकी आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी शहरात येणार आहे. त्यासाठी निघोजे जॅकवेलसह चिखलीतील जलशुद्धिकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. चाचणी सुरू असून त्याचे उद्घाटन रखडले आहे. या जलशुद्धिकरण केंद्राच्या उद्टनासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस येणार आहेत.
तर याच खर्चात होईल नवीन रस्ता...
चिखली येथील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यातील रस्त्यावर रोहित्र संच व खांब आहेत. ते हटविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी १ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चाचा प्रस्ताव आयुक्त सिंह यांनी आपल्या अधिकारात मंजूर केला. त्या प्रस्तावानुसार उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार असल्याचे नमूद आहे तसेच, रस्त्यावरील हे रोहित्र दौऱ्यासाठी अडथळा ठरत असल्याने ते हटविण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सुखकर प्रवासासाठी महापालिका एवढा मोठा खर्च करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दौऱ्यावरील अडथळा हटविण्यासाठी होणाऱ्या दीड कोटींच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम होऊ शकते, अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.