पिंपरी : दुर्मिळ आजारावरील जोलजेन्स्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतून मिळवून देतो, असे अमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक केली. ही घटना २५ ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत रावेत येथे घडली. या प्रकरणी अमित शांतारामजी रामटेक्कर (वय ३४, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी एस.लक्ष्मी कंथन (रा. कोईम्बतुर, तमिळनाडू) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी टाईप १ नावाचा आजार आहे. या आजारावरील जोलजेन्स्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतील नोवायटीस कंपनीतून मिळवून देतो, असे सांगून आरोपीने विश्वास संपादन करून फिर्यादकडून तब्बल दीड कोटी रुपये घेतले. मात्र, आरोपीने हे पैसे कंपनीला दिला नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे परत मागितले असता त्यांना आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद करून ठेवला, आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद आहे.