पिंपरी : मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असल्याने पिंपरी चौक ते मोरवाडी चौक हा मार्ग अरुंद झाला आहे. त्यातच काही खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्यातच थांबलेली असतात. परिणामी, दररोज कोंडी होत आहे. येथील कामाचा वेग संथ असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मोरवाडी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानचे ५०० मीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना १५ ते २० मिनिटे वेळ लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडीपर्यंत कामे वाहनचालकांना मनस्ताप देणारी ठरत आहेत. या कामांना सुरुवात झाली असून, आंबेडकर चौकातील काम पूर्ण झाले आहे. मोरवाडी चौक ते चिंचवड येथील एम्पायर इस्टेटपर्यंतचे काम अपूर्ण आहे. शेजारी मेट्रोच्या पिलरचेही बांधकाम होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून खड्डे खोदून ठेवले आहेत.
यामुळे पडते वाहतूककोंडीत भरपिंपरी मार्केटकडून आल्यानंतर चिंचवड स्टेशनकडे वळण घेताना तसेच पिंपरी चौकाकडून चिंचवड स्टेशनकडे जाताना चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होत आहे. या चौकात मेट्रोस्थानक असल्याने मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी घरापासून स्वतःचे वाहन घेऊन आल्यानंतर येथील पदपथावर अथवा इतरत्र कोठेही उभे करतात. तसेच येथे रिक्षा थांबाही आहे. मात्र, हा थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे कोंडीत भर पडते.जीव मुठीत धरून ओलांडतात रस्ता
या परिसरात मेट्रो स्थानक, महाविद्यालय, महापालिका भवन, मार्केट, बसथांबा तसेच विविध कार्यालये असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. यामध्ये पादचारी नागरिकांचाही समावेश असतो. चौकातील रस्ता पायी ओलांडताना वाहने वेगाने घासून जातात. त्यातच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. यामुळे पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.