पिंपरी : शहरात दहशत पसरविण्यासाठी टोळक्याने नव्या वर्षाची सुरुवातच वाहनांच्या तोडफोडीने केली. रिक्षातून आलेल्या टोळक्याने रहाटणी आणि सांगवी परिसरातील १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि. १) पहाटे दोनच्या सुमारास घडली. गस्तीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला धक्का देत टोळक्याने पळ काढला.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दोनच्या सुमारास काहीजणांच्या टोळक्याने रिक्षा चोरून त्या रिक्षातून रहाटणी येथे गोडांबे कॉर्नर येथील परिसरात आले. परिसरात पार्क केलेल्या वाहनांची दगड, विटा तसेच काठ्यांनी तोडफोड केली. गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पहिले असता पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना धक्का देत टोळक्याने पळ काढला. या परिसरात दोन बस, काही चारचाकी वाहने, तीनचाकी रिक्षा अशी १२ वाहने फोडल्याचे समोर आले आहे. नक्की किती गाड्या फोडल्या आहेत याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. टोळक्याने चोरी केलेली रिक्षा कासारवाडी परिसरात सोडून देऊन पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.
टोळक्याने एकाला केले गंभीर जखमी
रहाटणी येथे वाहनांची तोडफोड करीत हे टोळके रिक्षातून पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरात गेले. तेथे त्यांनी पाच, चारचाकी वाहने तसेच एक रिक्षा अशा एकूण सहा वाहनांची सिमेंटचा ब्लाॅक टाकून तोडफोड केली. जोरजोराने आरडाओरडा करून दहशत पसरविली. तसेच एकाला सिमेंटचा ब्लाॅक मारून गंभीर दुखापत केली आहे. करण दीपक उत्तमचंदानी (वय २७, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.