पिंपरी : पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. शुक्रवारपासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने हॅलो पिंपरी-चिंचवडच्या अंकात ४ मार्चच्या अंकात केले होते. कमी पाऊस, धरणातील कमी पाणी साठा आणि जलसंपदा विभागाकडून केलेली पाणीकपात या पार्श्वभूमीवर आठ मार्चला बैठक झाली. त्या वेळी सगळीकडे एक वेळ पाणीपुरवठा आणि १० टक्के पाणीकपात करावी, असा विषय झाला. त्यानंतर आज आयुक्तांच्या कक्षात बैठक झाली. या वेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, आरपीआय आठवले गटाच्या प्रमुख चंद्रकांता सोनकांबळे, अपक्षांचे गटनेते सुरेश म्हेत्रे, ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण, शहर अभियंता महावीर कांबळे या वेळी उपस्थित होते.याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाने केलेल्या सूचनेनुसार सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी चर्चा करून आढावा घेऊन कपातीचा निर्णय घेतला आहे. शहरातील रहिवासी भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, व्यावसायिक वापरासाठी शहराबाहेर टँकर पाठविणार नाही. (प्रतिनिधी)
शहरात १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय
By admin | Published: March 10, 2016 12:42 AM