पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी या पुण्यातील तिसऱ्या मेट्रो मार्गाचा ५००० वा सेगमेंट (जो खांबांवर बसवला की मेट्रो मार्ग तयार होतो.) शुक्रवारी तयार झाला. एकूण २३ किलोमीटरच्या या मेट्रोमार्गातील १६ किलोमीटरचा मार्ग सेगमेंट बसवून तयार झाला आहे. त्यावर रूळ बसविण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
या मार्गावरचा ५००० वा सेगमेंट शुक्रवारी कास्टिंग यार्डमध्ये तयार झाला. या प्रकल्पाचे २००० सेगमेंट २४ एप्रिल २०२३ ला पूर्ण झाले होते, पुढील ७ महिन्यात तब्बल ३००० सेगमेंट्स उभे झाले. अशा प्रकारे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून एकूण १६ महिन्यात ५००० सेगमेंट्स पूर्ण झाले आहेत. त्यातील २ हजारपेक्षा जास्त सेगमेंट प्रत्यक्ष मार्गावर बसवून झाले आहेत.
कामाला आला वेग...
- हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे हिंजवडी आयटी हबमध्ये दररोज जा-ये करणारे कर्मचारी, नागरिकांना स्वस्त, सुलभ व आरामदायी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.- पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे नियंत्रण आहे. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळेच कामाला गती मिळाली आहे.
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यापासून अवघ्या दीड वर्षात ८० टक्के खांब उभारणी पूर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. - आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी
२३ स्थानके असणार
शिवाजीनगर हिंजवडी हा पुण्यातील तिसरा मोठा मेट्रो मार्ग आहे. त्याचे एकूण अंतर २३ किलोमीटरचे आहे. संपूर्ण मार्ग उन्नत म्हणजे रस्त्यावर उभे केलेल्या १८ ते २० मीटर उंचीच्या खांबांवरचा आहे. त्यामध्ये २३ स्थानके आहेत. विशेष म्हणजे या मार्गावरचे शिवाजीनगर हे पहिलेच स्थानक महामेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला वरील बाजूने फूट ओव्हर ब्रीज करून जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकातून त्या स्थानकात रस्त्यावर न येताही जाणे शक्य होणार आहे.
सेगमेंट म्हणजे काय?
सेगमेंट हा मेट्रो मार्गातील महत्त्वाचा घटक आहे. तो उच्च दर्जाच्या काँक्रिटमधून कास्टिंग यार्डमध्ये तयार केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष मेट्रो मार्गावर आणून खांबांच्या वर बसवला जातो. दोन खांबांच्या मध्ये वायर रोपमध्ये ओढून हे सेगमेंट बसवले जातात. एका सेगमेंटचे वजन ४० ते ४२ टन असते. शिवाजीनगर-हिंजवडी हा मेट्रोमार्ग १६ किलोमीटरचा आहे. त्यासाठी एकूण ८ हजार सेगमेंट लागणार आहेत, त्यातील ५ हजार सेगमेंट तयार असून, २ हजारपेक्षा जास्त सेगमेंट आता मार्गावर बसवून झाले आहेत.