खडकी : तुमच्या मोटारीच्या टायरमध्ये हवा कमी आहे, असे भासवून दिशाभूल करून टायर सुस्थितीत असताना, तब्बल १८ पंक्चर झाल्याची भीती घातली. त्यानंतर एका मोटारचालकाकडून १८०० रुपये उकळणाऱ्या टायर पंक्चर दुकानदार व त्याच्या साथीदाराला खडकी पोलिसांनी जेरबंद केले. ग्राहकाच्या तक्रारीनंतर खडकी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्गावर ग्राहकांना लुटण्यासाठी वाकडेवाडी ते कासारवाडी पंक्चरवाल्यांची टोळी सक्रिय असल्याचा प्रकार प्रथम ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबर २०१८ ला उजेडात आणला होता. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत चंद्रकांत शिंदे (रा. बोपोडी) यांनी पंक्चर काढण्याच्या बहाण्याने लूट करणाºया दुकानदारांविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून खडकी पोलिसांनी बंटी ऊर्फ आशुतोष रवींद्र येरेल्लू (वय ३५, रा. बोपोडी) व सुमित सुरेश पाल (वय २०, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार संकेत शिंदे हे त्यांच्या मोटारीतून (क्रमांक एम एच १४, बी एक्स २८७६) मुंबई-पुणे महामार्गाने शिवाजीनगरच्या दिशेने जात होते.खडकी रेल्वे स्थानकासमोरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवत मोटारीचा वेग कमी करण्यास भाग पाडले. मोटारीच्या जवळ जाऊन टायरमध्ये हवा कमी आहे, असे सांगून पंक्चर काढण्याचे दुकान जवळच आहे, टायर तपासून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मोटारचालक त्या दुकानाजवळ गेले. टायर तपासताना दुकानदाराने शॅम्पू मिश्रितपाणी टायरवर ओतले. शॅम्पूच्या पाण्याचे विविध ठिकाणी हवेचे बुडबुडे येत असल्याचे दिसून आले. पंक्चर काढण्याच्या किटमधील टोकदार हत्यार टायरमध्ये विविध ठिकाणी खोचून त्याने एकाच टायरमधील तब्बल १८ पंक्चर काढले असल्याचे सांगितले. प्रत्येक पंक्चरसाठी १०० रुपयेप्रमाणे शिंदेंकडून १८०० रुपये उकळले. टायरला एवढे पंक्चर असताना, मोटार येथपर्यंत आली कशी? अशी शंका मोटारचालकाच्या मनात निर्माण झाली.मोटारचालकांची दिशाभूल करून लूटपंक्चर नसतानासुद्धा पंक्चर करून मोटारीच्या टायरचे नुकसान केल्याची बाब शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी थेट खडकी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाºयांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर मोटारचालकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करणाºया दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर जामिनावर सुटका केली. पुढील तपास खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे करीत आहेत.