पिंपरी : यमुनानगर येथे झालेल्या हाणामारीच्या घटनेप्रकरणी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह अन्य १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप केला जात होता तर फिर्याद दाखल करण्यास फिर्यादी तयार नसल्याने यास विलंब होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. आंदोलन, आरोप प्रत्यारोप या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर ११ दिवसांनी २० जणांविरूद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेश गारूळे यांनी या प्रकरणी फियाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह प्रदीप हिंगे, राहुल गवारे, रोहीत गवारे, विशाल बाबर, शिवराज चिखले, हेमंत भोसले, अरविंद भोकरे,चंदन सिंग, गोविंद सातपुते, रवींद्र तळेकर, ऋशिकेश तळेकर, दादा तळेकर, अभिषेक माने,अजिंक्य माने, आदिनाथ काळभोर, विश्वास साकोरे,बंटी साळुंखे, सुनील शेलार, किशोर दराडे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेश नारायण गारुळे (वय ४८ रा. मोशी प्राधीकरण,) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दीमध्ये म्हटले आहे की, गारुळे त्यांच्या मित्रासह यमुनानगर पोलीस चौकी येथे आले असता तुषार हिंगे व त्याचे साथीदार गाडीतून आले व शिवीगाळ करत गारुळे यांच्यावर तलवारीने वार केला. हा वार चुकवल्यानंतर चंदनसिंग याने गारुळेच्या डोक्याला पिस्तूल लावले. मात्र पिस्तुलाचा चाप न दबल्याने तेथील सिमेंटचा गट्टूत्यांच्या डोक्यात मारला. तसेच गारुळे यांच्या मित्रासही मारहाण केली. ही मारहाण पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचे पालिसांनी सांगितले आहे
हा प्रकार दस-याच्या दिवशी पोलीसचौकी समोर घडला होता. जिवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण असे गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केली नसून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत. यमुनानगर पोलीस चौकी येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून वादंग झाले.या प्रकरणी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम छावा संघटनेच्या वतीने कालिदास गाडे, श्याम शिकारी,अमित घेणंद आंदोलन केले होते. फिर्याद दाखल झाली, त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.