पिंपरी-चिंचवड (वाकड) : महामार्गावर नियमबाह्यपणे थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून मोटारीने जोरदार धडक दिली यात दोघे ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील साई स्नॅक्स बार समोर शनिवारी (दि १) पहाटे तीन वाजता झाला.
मोटार चालक सोमनाथ बिभिषण पवार (वय २७, याचा जागीच मृत्यू झाला तर मुकेश पवार (वय २६ दोघेही रा नवी मुंबई, ठाणे) याचा ऊपचारा दरम्यान पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला तर किशोर राजेंद्र मगर (वय २७) याच्यावर भोसरीतील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई सुभाष कदम यांनी हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली असून टेम्पाे चालक ईश्वर गोविंद संकपाळ (वय ३०, रा. शेलंटी, जिल्हा सातारा) याच्यावर महामार्ग वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फौजदार नंदराज गभाले यांनी दिलेली माहिती अशी नवी मुंबईहुन हे तिघे मित्र एमएच ४३, बीजी ५४३१ या क्रमांकाच्या मोटारीने पुण्याला येत होते दरम्यान मुंबई-बंगळूर महामार्गाच्या कडेला ताथवडे येथील साई स्नॅक्स बार समोर अंधारात इंडिकेटर अथवा रिफ्लेक्टर न लावता एमएच ०१, सीआर ५३४९ क्रमांकाचा टेम्पो महामार्गाच्या कडेला थांबला होता तो न दिसल्याने थांबलेल्या टेम्पोवर पाठी मागून मोटारीची जोरदार धडक बसली यात मोटारचालक जागीच ठार झाला. मोटार चालक सोमनाथ पवार याला दोन वर्षांची आणि एक चार महिन्यांची मुलगी आहे.