पिंपरी : कपड्याच्या कंपन्यांचे व्हिडिओ लाईक करून घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर लिंक पाठवून प्रिपेड टास्क खेळ खेळण्यास सांगून महिलेची एक लाख ७२ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. सांगवी परिसरात १७ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लेतिषा, रिया ग्लोबल, ग्लोबल चॅट प्लॅटफॉर्म कंपनी आणि बँकधारक व कंपन्या यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला ऑनलाइन माध्यमातून कपड्याच्या मोठमोठ्या कंपन्यांचे व्हिडिओ लाईक केल्यास घरबसल्या पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. लिंक पाठवून प्रिपेड टास्क खेळू, असे सांगून फिर्यादीकडून एक लाख ७१ हजार २०० रुपये ऑनलाइन माध्यमातून घेत त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील तांबे तपास करीत आहेत.