वडगाव मावळ/लोणावळा : मावळ तालुक्यातील माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी जिल्हा परिषद पाच गटांतील ३५ पैकी १५ जणांनी माघार घेतल्याने आता २० उमेदवार रिंगणात असून, पंचायत समिती १० गणातून ७६ उमेदवारांपैकी ३१ जणांनी माघार घेतली असून, आता ४५ जण रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.काही मतदारसंघांत चौरंगी, तर काही मतदारसंघांत पंचरंगी लढती होत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाच बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे.पंचायत समितीवर मागील काही वर्षापासून भाजपाचे कमळ फुलत आहे. कमळाच्या जागेवर घड्याळाची रिंग वाजावी याकरिता सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्व नेते एका व्यासपीठावर आले. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचा चंग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बांधला. मात्र, उमेदवारी देतांना ठराविक गटांच्या नेत्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांनाच उमेदवारी बहाल केल्याने नाराज नेत्यांनी एकजुटीला तिलांजली देत बंडखोरींला खतपाणी घातल्याने पुन्हा एकदा मावळातील राष्ट्रवादीला बंडखोरीची घरघर लागली आहे. उमेदवार निवडताना घराणेशाहीचा विचार मारक ठरला. बंडखोरांची मनधरणी करण्यात पक्षाला अपयश आले. पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे बंडखोर मावळ ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष बाबूराव वायकर, सरपंच संघटनेचे मावळ अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, आंदर मावळ विभाग अध्यक्ष नारायण ठाकर, वडगाव शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम आसवले यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ढोरे व नेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले. आंदर मावळ अध्यक्ष मंगेश ढोरे, महिलाध्यक्षा शुभांगी राक्षे, युवाध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या नाराज गटाला एकत्र करत राष्ट्रवादीला समांतर अशी समांतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांची स्थापना करत वरील सर्व उमेदवार निवडून आणण्याचा चंग ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी बांधला आहे. बंडखोरी रोखण्यात भाजप श्रेष्ठींना यश आले आहे. शिवसेनेने अधिकृत उमेदवाराची माघार घेत अपक्ष बाबूराव वायकर यांना पुरस्कृत केले आहे. निवडून येण्याची क्षमता पाहून हे बेरजेचे राजकारण खेळल्याचे शिवसेना सांगत असली तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची माघार व त्या जागी आयात उमेदवार हा चर्चेचा विषय ठरला आहे. मनसेने कोणालाही उमेदवारी दिली नसून सध्या तरी तटस्त भूमिका घेतली आहे. (वार्ताहर)
गटांसाठी २०, गणांसाठी ४५ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 1:59 AM