पिंपरी : ऑनलाईन काम करून दिवसाला पाच ते आठ हजार रुपये मिळतील, अशी बतावणी करून इंजिनियर महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर टेलिग्रामव्दारे मेसेंजरव्दारे मेसेज करून वेगवेगळे टास्क देऊन २० लाख १५ हजार रुपयांची महिलेची फसवणूक केली. हिंजवडी येथे ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील इंजिनियर असलेल्या २८ वर्षीय महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन महिला आरोपींसह सहा खातेधारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला साॅफ्टवेअर डेव्हलपर आहे. फिर्यादी महिलेला आरोपी महिलेने व्हाट्सऍप वरून संपर्क साधला. झेल्थ डिजिटल एजन्सी इंडियन ग्लोबल मीडियामध्ये तुमच्यासाठी चांगल्या ऑफर असून तुम्ही काम करण्यासाठी इच्छुक आहात का, असे आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला विचारले. तसेच त्यासाठी प्रत्येक दिवसाला पाच ते आठ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यांनतर टेलिग्राम मेसेंजरद्वारे मेसेज करून वेगवेगळे टास्क दिले. तसेच आरोपींच्या वेगवगेळ्या खात्यामध्ये एकूण २० लाख १५ हजार रुपये पाठविण्यास सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.