पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले. एकूण १६०८ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळच्या टप्यात उत्साह चांगला होता. सकाळी साडेअकरापर्यंत २०.७३ टक्के मतदान झाले.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकुण ३२ प्रभागातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि एमआयएम आणि अपक्ष असे एकुण ७७३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १०,७१० कर्मचाºयांरी नियुक्त आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाºयांचे १ पथक नियुक्त करण्यात आले असून, यात १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी अशा ६ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.
शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेसातला मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच सगळीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. सकाळच्या टप्यात मतदानाचा उत्साह कायम होता. पहिल्या टप्यात नोकदार, कामगार कष्टकरीवर्गाचा समावेश अधिक होता. या मतदानाला नागरिकांप्रमाणेच कलावंतांनीही हजेरी लावली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापौर शकुंतला धराडे यांनीही पिंपळेगुव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच निगडीत प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले. भाजपाचे शहारध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्नी अश्विनी, भाऊ शंकर व विजू जगताप यांनीही पिंपळेगुरव येथे सहपरिवार येऊन मतदान केले. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका यादव हिने बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे मतदान केले. सकाळी थेरगांव प्रभाग क्रमांक २४ मधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे, चिरंजीव प्रताप व विश्वजित यांनी मतदान केले. खासदार अमर साबळे यांनी मतदान केले. माजी आमदार विलास लांडे व माजी महापौर मोहीनी लांडे, मुलगा विक्रांत लांडे यांनी भोसरीत मतदान केले. आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनीही मतदान केले. पहिल्या टप्यात २०.७३ टक्के मतदान करण्यात आले.