चिंचवड : येथे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्या ठिकाणी तेल अंगावर पडून आगीत होरपळून मृत्यू झालेल्या गटई कामगार पोपट बनसोडे यांच्या कुटुंबीयांची विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. बनसोडे यांच्या पत्नी निर्मला यांच्याकडे त्यांनी २० हजार रुपये सुपूर्द केले. विद्युत महावितरणकडून बनसोडे कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.शनिवारी दुर्घटना घडली, त्या वेळी तातडीने मदत अधिकारी गेले. मात्र, बनसोडे कुटुंबीयांनी त्या वेळी मदत घेण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर आर्थिक मदत देण्याऐवजी विद्युत वितरणकडून मदत मिळणे अपेक्षित असल्याचे मत बनसोडे यांच्या पत्नी निर्मला यांनी व्यक्त केले होते. विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा बनसोडे कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. प्रशासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू केल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी निर्मला बनसोडे यांना २० हजार रुपयांची मदत दिली. विद्युत रोहित्राचा स्फोट कशामुळे झाला, याचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीने जळालेल्या रोहित्राची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. समिती अहवाल सादर करेल. (वार्ताहर)
बनसोडे कुटुंबीयांना २० हजारांची मदत
By admin | Published: May 12, 2016 1:11 AM