पिंपरी : पिंपरी - चिंचवड पोलीस भरतीमध्ये २६२ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. शारीरिक चाचणीच्या पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांपैकी २८१ जण हजर होते. त्यापैकी २२५ उमेदवार पात्र ठरले.
पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. तेव्हापासून आत्तापर्यंतची ही तिसरी भरती आहे. यापूर्वीच्या दोन भरतीसाठी शारीरिक चाचणी पुण्यामध्ये घेण्यात आल्या होत्या. मात्र पिंपरी - चिंचवड शहरातील ही पहिलीच भरती प्रक्रिया पार पडत आहे.
भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात पहाटे चार वाजता भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. ५०० उमेदवारांना पहिल्या दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र त्यापैकी अवघे २८१ जण हजर होते. त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यापैकी २२५ जण या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले. पहाटे चार वाजल्यापासून शारीरिक चाचणी असल्याने शहराबाहेरून आलल्या उमेदवारांनी मैदानाच्या बाहेरच मुक्काम केला. १० जुलै पर्यंत उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होणार आहेत. मात्र पालखी साेहळ्याच्या कालावधीत या चाचण्या बंद असणार आहेत. भरतीच्या ठिकाणी फिरते प्रसाधनगृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका होती. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.