पिंपरी : ऑनलाईन क्रिप्टोकरन्सी (बिटकॉईन) विक्रीच्या बहाण्याने एका व्यक्तीची २३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ मे ते १जून २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी प्रशांत रमेश सिंग (वय ३९, रा. मारुंजी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकासह बी. सी. एम इनव्हेस्टमेंट ॲडव्हायझरी आणि फानाशीअल स्ट्रीट हाँगकाँग या कंपनीच्या ॲडव्हायझरवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हॉट्सअप क्रमांकावर क्रिप्टोकरन्सी खरेदीसाठी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर बी.सी.एम इनव्हेस्टमेंट ॲडव्हायझरी आणि फानाशीअल स्ट्रीट हाँगकाँग या कंपनींच्या ॲडव्हायझरने व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये फिर्यादींचा समावेश केला.
फिर्यादीला ऑनलाईन संपर्क साधून त्यांच्यासोबत खोटे ऑनलाईन ॲग्रीमेंट करून आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने फि्र्यादीला तब्बल २३ लाख १० हजार रुपयांची क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास भाग पाडले. आरोपी हे आपली फसणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर फि्र्यादीने आपले पैसे परत मागितले. त्यासाठी आरोपींशी मेल आणि व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे संपर्क साधला. मात्र, आरोपींनी कोणताही प्रतिसाद न देता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.