पिंपरी : महापालिका क्षेत्रातील दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, पवना नदीतील रावेत येथील केंद्राची शंभर एमएलडी क्षमता वाढविणे, इंद्रायणी नदीतून शंभर एमएलडी आणि वाघोली योजनेतून ३५ असे एकूण २३५ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहील. त्याला पावसाळादेखील उजाडेल किंवा त्यापुढेदेखील कालावधी लागेल. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून प्रतिदिन केवळ ४२० एमएलडी पाणीउपसा करण्याची परवानगी आहे. महापालिका पाचशे एमएलडी पाणी उचलत आहे. त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरावा लागत आहे. अधिक पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरून महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. मात्र, पाणी उचलण्याची क्षमता कमी आहे. ही क्षमता वाढविण्याच्या विषयाला मंजुरी दिली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यशहरात पाणी कपात केलेली नाही. दिवसाआड पुरसे पाणी दिले जात आहे. रावेत येथील पंपगृहातील १९ पंप चोवीस तास सुरू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे. जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर तेवीसमधील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या पाचशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. या क्षमतेत ५८० एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. विजेचा भारदेखील वाढवून घेतला जाणार आहे. शंभर एमएलडी अधिकचे पाणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
इंद्रायणीचाही पर्यायपुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह महापालिकेस हस्तांतरित होणार आहे. त्यातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतरसुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल. तसेच देहू बंधाऱ्यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पाणीपुरवठा करता येईल. देहूलाही पाणी प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.