अतुल परदेशी, जुन्नरजुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर अशा चार तालुक्यांच्या मिळून असणाऱ्या विभागामध्ये किमान ५० बिबट्यांचे अस्तित्वात असून, १९९५ ते २०१५ दरम्यानच्या २० वर्षांत या भागातून २३५ बिबटे पकडण्यात आले आहेत़ डिंगोरे व या परिसरात घडलेल्या घटना पाहता सध्या ८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.खामुंडी येथील एका पिंजऱ्यात आज एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले़ जुन्नर तालुक्यातील माणिकडोह या ठिकाणी संपूर्ण भारतातील एकमेव बिबट निवारण केंद्र असून सद्या या केंद्रात एकूण २९ बिबटे असून त्यात २२ मादी व ७ नर बिबटे आहेत़ नाशिक येथे पकडलेल्या बिबट्याचा आॅपरेशन करून एक डोळा काढण्यात आला आहे तर एका बिबट्याला तीनच पाय असून एका ला पूर्ण पंजा नाही़ त्यामुळे त्यांची संपूर्ण शेवटपर्यंत देखभाल या केंद्रात केली जाणार आहे़ देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार माणीकडोह येथील बिबट निवारण केंद्र हे डिसेंबर २००९ पासून वाईड लाईफ, दिल्ली ही संस्था वनविभागाच्या सामजस्याने चालवत असून येथे या आधी २७ बिबटे होते, त्यांचा दर महा खर्च हा ५ लाख रुपये एवढा असून त्यांना दिवसाला साधारण ८० किलो मास द्यावे लागत आहे. तसेच वरील सर्व बिबट्यांची देखरेख करण्यासाठी डॉ. अजय देशमुख यांच्या बरोबर सात लोकांचे पथक करत आहे़ या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च ही संस्था, करते असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़ चार तालुक्यात गेल्य २० वर्षात २३५ बिबटे पकडण्यात आले असले तरी त्यातील बहुतांशी बिबट्यांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे़ त्यात प्रामुख्याने शिकार करताना विहिरीत पडले, ऊस शेतीत सापडलेले बछडे अशांना काही काळाने जंगलात सोडून दिले आहे़ जे जखमी झाले अथवा अपंग आहेत, निवारण केंद्रात अधिक काळ राहिल्याने जे शिकार करणे विसरले आहेत, अशांनाच या केंद्रात कायमस्वरुपी ठेवण्यात येते़ या बिबट्यांच्या चार कॅटेगरी करण्यात आल्या असून १) लहानपणापासून वाढवलेले बिबटे, २) अपंग बिबटे ३) वृद्ध बिबटे, ४) २००४ ते २००५ दरम्यान नागरी वस्तीत पकडण्यात आलेले बिबटे असे चार प्रकार असून यांना जागेवरच खाद्य देऊन देखरेख करावी लागत आहे़ नाशिक येथे २००८ साली पकडलेल्या बिबट्या त्यावेळी ६ वर्षाचा होता़ आता तो १५ वर्षांचा असून सर्व साधारणपणे बिबट्यांचे आयुष्य हे १७ ते १८ वर्षे एवढे असते़ या ठिकाणी त्यांची योग्य देखरेख होत असल्याने ते २० ते २१ वर्षांपर्यंत जगतील, तसेच नाशिक येथे एका अपघातात एका मादी बिबट्याचा अपघात झाला होता़ त्यावेळी ती गरोदर असताना तिने दोन छावा पिल्लांना जन्म दिला़ त्यांची २००८ पासून आजतागायत माणिकडोह बिबटे निवारण केंद्रात देखरेख होत आहे़ सध्या निवारण केंद्रात 29 बिबटे असून 22 मादी तर 7 नर बिबटे आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़
२० वर्षांत पकडले २३५ बिबटे
By admin | Published: May 15, 2015 5:21 AM